अभया सन्मान’ सोहळा शनिवारी (दि.२४ मे)वंचित विकास संस्थेतर्फे आयोजन ; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

‘
पुणे : एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘अभया सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे. वंचित विकास संस्थेतर्फे शनिवार, दि.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील गांजवे चौक येथील पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या मीनाक्षी नवले, तृप्ती फाटक, देवयानी गोंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वुमनिया पुणे च्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर उपस्थित राहणार असून व आधार संस्थेच्या संस्थापक डॉ. नंदा शिवगुंडे या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संस्थेतर्फे एकल महिलांसाठी अभया मैत्री गट चालविला जातो. अभया मैत्रीगटातर्फे परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग काढणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्याला अभया सन्मान असे म्हणतात. यावर्षी अभयाला ११ वर्षे पूर्ण होत आहेत.
बीड मधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानीक मूल्य समाजात रुजविणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूर मधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबीता धुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्त्वाची लढाई लढणारी कार्यकर्ती रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.
याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या स्त्रियांच्या गोष्टी आपण पुस्तकांतून वाचतो. परंतु ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणारी पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व तिच्या पतीवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारी आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘अभया’तर्फे वाचनकट्टा चालविला जातो. ‘ग्रामपरिवर्तन प्रबोधिनी’, मु. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके आपण भेट कार्यक्रमात देण्यात येणार आहे. वंचित विकास ही सामाजिक काम करणारी नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे स्त्रिया, मुले, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजुर, शहरी व ग्रामीण गरीब इ. घटकांमध्ये गेली ३९ वर्षे सुरु आहे. तरी अभया सन्मान या कार्यक्रमास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.