July 2, 2025

नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव व मार्गदर्शन

0
IMG-20250412-WA0007
Spread the love

  • केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व ‘अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’चा संयुक्त उपक्रम

पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (एपीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका, तसेच ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार आहेत, अशी माहिती ‘एपीएमए’च्या संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली.

डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आशा बाळगून ‘नीट’ परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे शहरात लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अध्ययनावर (सेल्फ स्टडी) भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नाना त्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी गुणवत्ता असूनही केवळ पैशाअभावी हे विद्यार्थी मागे पडू नयेत, या उद्देशाने मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून ‘एपीएमए’ने हा उपक्रम हाती घेतला आहे.”

‘नीट’ परीक्षेच्या प्रवासात ‘एपीएमए’ या विद्यार्थ्यांसाठी सारथी म्हणून काम करेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सविस्तर उत्तरांसह पाच सराव प्रश्नपत्रिका www.apma.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील. भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांसाठी प्रत्येकी दोन, अशी एकूण सहा ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने होतील. ही व्याख्याने झूम, तसेच युट्युबवर लाईव्ह पाहता येतील. ‘नीट’ परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे नियम काय आहेत, यावर एक मार्गदर्शनपर व्याख्यानही होणार असल्याचे डॉ. तपस्वी म्हणाल्या.

पुणे शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास आणि यशाची शक्यता निश्चित वाढेल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी www.apma.co.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. १३ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button