पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी कर व्यावसायिकांचे मोलाचे योगदान
- सीएमए बी. एम. शर्मा यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ‘अमृत ज्ञानकुंभ’ राष्ट्रीय कर परिषद
पुणे : “पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी कर सल्लागार, सनदी लेखापाल यांच्यासह करदात्यांची भूमिका मोलाची आहे. योग्य करसंकलन व व्यवस्थापन, पारदर्शी अर्थव्यवस्था यासाठी आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी अर्थकायद्यातील नवे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटीसारखे प्रगत तंत्रज्ञान व नवी कौशल्ये आत्मसात करायला हवीत,” असे प्रतिपादन केंद्रीय काॅर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अपील प्राधिकरणाचे सदस्य सीएमए बी. एम. शर्मा यांनी केले.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने आयोजित ‘अमृत ज्ञानकुंभ २०२५’, या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवरमधील सहकार भवन येथे ही दोन दिवसांची परिषद होत आहे. ‘कर सल्लागार : पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ’ अशी या कर परिषदेची संकल्पना आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) या संस्थांचे सहकार्य या राष्ट्रीय कर परिषदेसाठी लाभले आहे.
याप्रसंगी ‘एआयएफटीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. समीर जानी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय कर परिषदेचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सोनवणे व ‘एमटीपीए’चे अध्यक्ष ऍड. प्रसाद देशपांडे, उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर, ज्येष्ठ कर सल्लागार ऍड. निकिता बढेका, ऍड. दीपक गोडसे, ऍड. विनायक पाटकर, ऍड. नारायण जैन, ऍड. संतोष गुप्ता, ऍड. भास्कर पटेल, ऍड. नितीन गौतम, ‘एमटीपीए’चे उपाध्यक्ष ऍड. अनुरुद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रसंगी विशेष स्मरणिकेचे, एमटीपीए टॅक्स ट्रिब्यूनचे आणि प्रकाश पटवर्धन लिखित जीएसटी (तिसरी आवृत्ती) या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ‘एआयएफटीपी’च्या नव्या संकेतस्थळाचेही अनावरण झाले. ऍड. दीपक गोडसे यांनी ‘एमटीपीए’ला पाच लाखांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्त केला.
सीएमए बी. एम. शर्मा म्हणाले, “बदल हा प्रत्येक क्षेत्राचा स्थायीभाव असतो. बदलांना संधी मानून पुढे जाणारा आपला व्यवसाय आहे. या कर परिषदेच्या निमित्ताने ज्या विषयांवर चर्चा होणार आहे, ते सर्व विषय महत्त्वाचे आहेत. ज्ञानाचे जतन, जोपासना आणि आदानप्रदान यामुळे शक्य होत आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. कायद्यांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. या सर्व गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. स्वतःला अद्ययावत ठेवणे हे गरजेचे आहे.”
समीर जानी म्हणाले, “‘आपल्या व्यावसायिक संस्थेचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारणे तसेच संस्थेच्या नियतकालिकाचे सभासदत्व नियमित घेणे, या गोष्टींचे पालन सदस्यांनी केले पाहिजे. हे नियतकालिक करप्रणालीसंदर्भातील ताज्या घडामोडींवर, बदलांवर नियमित भाष्य करते. त्याच्या वाचनातून सदस्यांना स्वतःला सातत्याने अपडेट राहणे शक्य होते. आपल्या व्यावसायिक विश्वाशी निगडीत बदलांना सकारात्मक दृष्टीने सामोरे जा. नवे व्यावसायिक ट्रेंड्स शिकत राहा. नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. युवा व्यावसायिकांमध्ये नवी कौशल्ये, नवकल्पनांचे प्रशिक्षण कसे होईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.”
ऍड. नरेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकात कर परिषदेची संकल्पना स्पष्ट केली. ज्ञान हे सत्य आणि सेवा हे कर्तव्य, या भावनेने परिषदेचे आयोजन ज्ञानाच्या आदानप्रदानासाठी केले आहे. चार महत्त्वाच्या संस्थांचे सहकार्य परिषदेसाठी लाभले आहे, असे ते म्हणाले.
