पुणे, ३० सप्टेंबर: इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियातर्फे आयोजित ‘द बॅटरी शो इंडिया २०२६’ च्या चौथ्या आवृत्तीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका विशेष गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. २२ ते २४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे हे मुख्य प्रदर्शन होणार आहे.
या परिषदेत देशातील बॅटरी, इलेक्ट्रिक वाहने आणि ऊर्जा साठवणूक या क्षेत्रांतील आघाडीच्या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यामध्ये फ्रॉस्ट अँड सुलिव्हनचे रिसर्च डायरेक्टर (मोबिलिटी – इलेक्ट्रिक व्हेईकल्स) श्री. प्रज्योत साठे; १लॅटिसचे सीनियर डायरेक्टर (आयजीएस) श्री. सुयोग केळसुकर; रिप्लसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरेन शहा; पाटील ऑटोमेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोज पाटील; अडोर डायगाट्रॉनचे मुख्य परिचालन अधिकारी श्री. प्रशांत खराडे आणि इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाचे वरिष्ठ समूह संचालक श्री. रजनीश खट्टर यांचा वक्ते म्हणून समावेश होता.
ग्रेटर नोएडा येथे होणाऱ्या ‘द बॅटरी शो इंडिया २०२६’ मध्ये ३०० हून अधिक प्रदर्शक आणि ४०० पेक्षा जास्त ब्रँड्स सहभागी होणार आहेत. यामध्ये कोरिया, जपान, जर्मनी आणि चीनसह आघाडीच्या जागतिक कंपन्यांचा समावेश असेल. सोबतच ‘रिन्यूएबल एनर्जी इंडिया एक्स्पो’ आणि ‘एनर्जी स्टोरेज समिट इंडिया’चेही आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलतांना फ्रॉस्ट अँड सुलिव्हनचे रिसर्च डायरेक्टर प्रज्योत साठे म्हणाले, भारतात २०२५ मध्ये पॅसेंजर ईव्ही विक्री सुमारे १,७८,००० युनिट्सवर पोहोचली असून, २०३२ पर्यंत ती वार्षिक १५ लाख युनिट्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या ईव्ही घटकांचे स्थानिक उत्पादन ५०-६०% असून पुढील ५-६ वर्षांत ते ८०-९०% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
इन्फॉर्मा मार्केट्सचे वरिष्ठ समूह संचालक रजनीश खट्टर यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशात १९.७ लाखांहून अधिक ईव्ही नोंदणी झाली आहे, ज्यामध्ये दुचाकी वाहनांचा वाटा तब्बल ११.५ लाख होता. ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी केवळ वाहन निर्मितीवर अवलंबून न राहता बॅटरी सेल, बीएमएस, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, चाचणी, सुरक्षा आणि पुनर्वापर या संपूर्ण पुरवठा साखळीचे भारतात सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. या परिवर्तनात पुण्याची भूमिका केंद्रस्थानी आहे. एमआयडीसीनुसार केवळ पिंपरी-चिंचवड भागात ४,००० हून अधिक उत्पादन आणि संलग्न घटक कार्यरत असून, महाराष्ट्राचे ‘ईव्ही धोरण २०२५’ देखील पुण्याला सेंटर ऑफ एक्सलन्स आणि बॅटरी रीसायकलिंगचे मुख्य केंद्र म्हणून अधोरेखित करते.
या वेळी बॅटरी निर्मितीतील ऑटोमेशनच्या भूमिकेवर भर देताना पाटील ऑटोमेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनोज पाटील म्हणाले, “बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ‘मेक इन इंडिया’मुळे उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. लहान बॅटरी घटकांचे देशांतर्गत उत्पादन ३०-३५ टक्क्यांवरून पुढील काही वर्षांत ७०-८० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे; ज्यामुळे प्रगत ऑटोमेशन आणि मल्टिपल प्रोडक्शन लाईन्सची मागणी झपाट्याने वाढेल. सुरक्षा, बॅटरीचे दीर्घायुष्य आणि ट्रेसेबिलिटीसाठी प्रक्रिया निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे असून, येत्या ३ ते ४ वर्षांत भारतीय ऑटोमेशन-लाईन क्षेत्रात ७०० ते ८०० कोटी रुपयांची व्यवसायाची मोठी संधी आम्ही पाहत आहोत.”
रिप्लस इंजिटेकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन शहा म्हणाले, “भारतात ग्रिड आणि व्यावसायिक ऊर्जा साठवणुकीत प्रचंड संधी असून, आमची उत्पादन क्षमता १ गिगावॉट अवर (GWh) वरून ६ गिगावॉट अवरपर्यंत वाढवली जात आहे. अपारंपरिक ऊर्जेमुळे ग्रीड स्थिरीकरणासाठी बॅटऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल; या जोरावर आमचा व्यवसाय २०२९ पर्यंत ₹८,००० कोटींचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे.”