कर्तृत्वाचा गौरव, समर्पणाला मान; पाच मान्यवरांना ‘कसबा पुरस्कार’ प्रदान
पुणे : पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याची परंपरा ग्रामदैवत व मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही जपली.
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. १५) उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल केपीआयटी उद्योग समूहाचे प्रमुख किशोर पाटील, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शक व सिनेकलावंत प्रवीण तरडे, आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल स्वामी मकरंद नाथ, आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. गणेश राख यांचा कसबा पुरस्काराने तसेच विधी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भाऊसाहेब निरगुडकर पुरस्काराने ॲड. पी. नारायण यांचा यांचा गौरव करण्यात आला. श्री कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. रेडिओ सिटीला २५ वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या प्रतिनिधींचा विशेष सन्मान करण्यात आला.
‘कसबा पुरस्कार’ ही केवळ पुरस्कार देण्याची परंपरा नसून, आपल्या कार्यातून समाजाला समृद्ध करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्याचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला सन्मान देण्याचा उपक्रम आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून अशा व्यक्तिमत्त्वांचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्यातून पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील विचार आहे.
गो. बं. दगलूरकर म्हणाले, भक्ती, संस्कृती आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधणाऱ्या गणेशोत्सवात कर्तृत्वाचा गौरव करण्याची परंपरा जपली जात आहे, याचे कौतुक आहे. ‘मूलधारोस्थीतोसी नित्यम’ या सूत्राची माहितीही त्यांनी विशद केली.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे म्हणाले, श्री कसबा गणपतीचा मान हा केवळ परंपरेतून मिळालेला मान नाही, तर त्यासोबत समाजाप्रती असलेली जबाबदारीही जोडलेली आहे. आपल्या कार्यातून समाजाला काहीतरी देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे, हीदेखील एक प्रकारची गणेशसेवाच आहे. कसबा पुरस्काराच्या माध्यमातून कर्तृत्वाचा सन्मान करताना कार्यसमर्पणाची प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंपरा जपत तिचा आशय काळानुरूप समृद्ध करणे, हीच या पुरस्कारामागची भूमिका आहे.
देऊळ बंद २ या चित्रपटातून होणारा नफा शेतकऱ्यांच्या हितासासाठी वापरणार असल्याचे प्रवीण तरडे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.
डॉ. गणेश राख म्हणाले, आमच्या रुग्णालयात मुलीच्या जन्माचे स्वागत गणपती सोहळ्यासारखे केले जाते. उपचाराचा खर्च घेतला जात नाही.
किशोर पाटील म्हणाले, देशासह विदेशातही केपीआटीचा शाखा विस्तार झालेला आहे. विदेशातील शाखांमध्येही श्री गणेश विराजमान आहेत.
फोटो ओळ : श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारप्राप्त व्यक्तींसमवेत गो. बं. देगुलरकर, श्रीकांत शेटे आणि मंडळाचे पदाधिकारी.
प्रति,
मा. संपादक
पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव ग्रामदैवत व मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आज करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
