September 25, 2026

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला  ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

0
IMG-20260830-WA0044
Spread the love

पुणे : आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर  पुणे अॅनिमल लिबरेशनच्या  तरुण प्राणी-अधिकार कार्यकर्त्यांनी रविवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या (एफ.सी. रोड) मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पथनाट्य सादर केले. देशातील ११ शहरांमध्ये सुरू असलेल्या अभियानाचा हा एक भाग होता. सुमारे दहा मिनिटांच्या या पथनाट्यात भारतातील डेअरी उद्योगातील नैतिक प्रश्नांवर प्रकाश टाकत गायी, म्हशी आणि त्यांच्या वासरांच्या स्थितीबाबत नागरिकांनी विचार करण्याचे आवाहन करण्यात आले.

‘कौन बनेगा करोड़पती’शी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमधील चर्चेपासून या अभियानाला प्रेरणा मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन आणि स्पर्धक सिद्धार्थ शर्मा यांच्यात डेअरी प्राण्यांच्या वास्तव परिस्थितीवर चर्चा झाल्याचा उल्लेख प्रेस रिलीजमध्ये करण्यात आला आहे. हा व्हिडिओ देशभरात मोठ्या प्रमाणावर पाहिला गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

डेअरी उद्योगाशी संबंधित प्रश्न केवळ प्राण्यांच्या हितापुरते मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षितता आणि पर्यावरणाशीही संबंधित असल्याचे आयोजकांनी सांगितले. दूध देण्याची क्षमता संपल्यानंतर गायींना सोडून देण्याच्या प्रकारावर सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांचाही यावेळी उल्लेख करण्यात आला. रस्त्यावर सोडून दिलेल्या जनावरांमुळे अपघात होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

“तरुणांपर्यंत हा विषय थेट आणि सहज पोहोचविण्यासाठी पथनाट्याचा मार्ग निवडला,” असे कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण गिरी यांनी सांगितले. तरुण अभियानकर्ते प्रांजल यांनीही या पथनाट्याच्या माध्यमातून डेअरी उद्योगाबाबतच्या चर्चेला सार्वजनिक अवकाशात आणण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, प्राणी, नागरिक आणि पर्यावरणाच्या हितासाठी अधिकाधिक वनस्पती-आधारित अन्नव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची मागणी या अभियानातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी