स्वरांचा स्वतंत्र आविष्कार करण्यात आई बुद्धीवादी : दिप्ती भोगलेजयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी सांगता समारंभ
पुणे : नाट्यसंगीतात जयमालाबाई शिलेदार या चालता-बोलता-गाता इतिहासच होत्या. आई कधी कंठाने गायली नाही तर ती डोळ्याने, ओठाने, हृदयाने आणि सर्वांगाने गायली. गाण्यात स्वरांचा स्वतंत्र आविष्कार करण्यात ती बुद्धीवादी होती. पूर्वसुकृतानेच तिला रंगमंदिर भारून टाकणारा, मन व्यापून टाकणारा आनंददायी षड्ज लाभला होता, अशा भावना गायक, अभिनेत्री आणि जयमालाबाई यांच्या ज्येष्ठ कन्या दिप्ती भोगले यांनी व्यक्त केल्या.
जयराम शिलेदार ट्रस्टतर्फे पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्मशताब्दी सांगता समारंभ शुक्रवारी (दि. २१) ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी दिप्ती भोगले यांनी आईविषयीच्या आठवणी जागविल्या. जयराम शिलेदार ट्रस्टच्या विश्वस्त वर्षा जोगळेकर उपस्थित होत्या. सांगता समारंभानिमित्त जयमालाबाई शिलेदार यांच्यावरील ‘स्वरमाऊली जयमाला’ ही ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली.
दिप्ती भोगले पुढे म्हणाल्या, आई हळवी असली तरी प्रसंगी कणखरपणे वागणारी होती. कुणाच्याही चांगल्या स्वरात स्वत:ला विसरून जाण्याचा तिचा स्वभाव होता. आई एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून किती महान होती हे मी आजही समजून घेत आहे. रंगमंचावर साभिनय गाणे कसे सादर करावे, पात्राशेजारी उभे राहताना हावभाव कसे ठेवावेत, शब्दांची फेक कशी असावी, गायनाबरोबरच संवाद कसे सादर करावेत असे अनेक बारकावे या ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून आजच्या पिढीला शिकायला मिळतील.
सुरुवातीस वर्षा जोगळेकर यांनी जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर आयोजित केलेल्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली. ‘स्वरमाऊली जयमाला’ या चित्रफितीच्या माध्यमातून ज्या रसिकांनी जयमालाबाई यांना प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळावा आणि नवीन पिढीतील कलाकार व रसिकांना त्यांचे ओझरते दर्शन व्हावे हा हेतू आहे.
