-वन्द्य वंदे मातरम्’मधून देशभक्ती आणि लोकसंस्कृतीचा जागर‘वंदे मातरम्’च्या सामूहिक निनादाने दुमदुमला सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा परिसर : शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे, पवित्रम् फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वन्द्य वंदे मातरम् मेळा देशभक्तीचा’
पुणे : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने व निनादाने दुमदुमलेला परिसर, रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा दिलेला संदेश, ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता, मल्लखांब, लाठी-काठी व मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकातून दिसलेली भारतीय परंपरेची आणि लोकसंस्कृतीची झलक आणि स्वातंत्र्यवीरांच्या जीवनगौरवाच्या प्रदर्शनीतून जागवलेली राष्ट्रभक्तीची भावना, अशा विविध उपक्रमांनी टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारून गेला.
भारताच्या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘वन्द्य वंदे मातरम् मेळा देशभक्तीचा’ या कार्यक्रमाला पुणेकर, विद्यार्थी आणि तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. देशभक्ती, भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम या मेळ्यात पहायला मिळाला.
शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे, पवित्रम् फाउंडेशन आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके व उपाध्यक्ष गजेंद्र पवार,शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आणि अध्यक्ष तुषार कुलकर्णी, सदस्य आणि स.प. महाविद्यालय विनाअनुदानित विभागाचे अध्यक्ष पराग ठाकूर, मंडळाच्या सचिव रमा कुलकर्णी, तसेच ‘वन्द्य वंदे मातरम्’ मेळा देशभक्तीचे समन्वयक व प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मेळ्याला भेट दिली.
भारतामातेचे पूजन व भारतमातेला अभिवादन, १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेतील ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन, रक्तदान शिबिर, ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम, सूर्यनमस्कार, मल्लखांब, लाठी-काठी व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तिपर गीते, भजन, पोवाडे आणि सांस्कृतिक सादरीकरणे यावेळी झाली.
चित्रकला व रांगोळी स्पर्धा, उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन, स्वदेशी, खादी, पुस्तके, खाद्यपदार्थ व सामाजिक उपक्रमांचे स्टॉल, भारतीय स्वातंत्र्यवीरांच्या जीवनगौरवाची प्रेरणादायी प्रदर्शनी, भारतीय पारंपरिक शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन, अवयवदान व नेत्रदान जनजागृती अभियान, शंखनादाच्या मंगल स्वरात राष्ट्रभक्तीचा जागर आणि राष्ट्रप्रेम जागविणारे प्रेरणादायी कविसंमेलन आदी उपक्रमही झाले. अग्निशमन दल, नागरी संरक्षण विभागाने उपकरणांची माहिती दिली. अभेद्य ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट वादन सादर केले, तर दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या अश्वारोहकांनी अश्वावरबसून हातात तिरंगा ध्वज हाती घेत सहभाग घेतला.
या मेळ्याच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देण्यासोबतच विद्यार्थी व तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुणेकर, विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुण, शिक्षक आणि नागरिकांनी मेळ्यात सहभागी होत देशभक्तीचा जागर अनुभवला.
