भारताची प्रतिभा’ या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (दि.२०)पुणे परिवार तर्फे कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांत पाटील, डॉ.शां.ब. मुजुमदार यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती
‘
पुणे : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध भाषेत लिहिलेले मराठी भाषेतील निवडक लेख पुस्तक स्वरूपात ‘भारताची प्रतिभा’ यामध्ये घेण्यात आले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि.२० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीमध्ये असलेल्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे.
पुणे परिवार तर्फे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां.ब. मुजुमदार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, महापौर मंजुषा नागपुरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्योती राठोर, सुरेश उज्जैनवाला, अॅड. प्रताप परदेशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
प्रतिभाताई पाटील यांच्या पन्नास वर्षापेक्षा जास्त कालखंडातील राजकीय, सामाजिक जीवन प्रवासासह त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विविध भाषेत लिहिलेले लेख ‘भारताची प्रतिभा जीवन गौरव ग्रंथ’ या पूर्वीच प्रकाशित केले गेले आहेत.तथापि, त्यातील मान्यवरांचे निवडक लेख या पुस्तकात घेण्यात आले आहेत.
‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील लेख त्यांच्या दुर्दम्य व्यक्तिमत्त्व व गुण वैशिष्ट्यांचा ठेवा म्हणता येईल. त्यांच्या जीवनासह व्यक्तिमत्वाची माहिती नव्या पिढीला व्हावी म्हणून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी महिला उद्यम ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात येईल. यामध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारणाऱ्या वीरमाता सुमेधा चिथडे, आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अदिती देशपांडे, डॉ.विनिता आपटे, भाग्यश्री चौंडे, माजी खासदार अॅड.वंदना चव्हाण यांचा समावेश आहे.
