April 17, 2026

वसंत ऋतूत बहरलेल्या फुलांनी दत्त मंदिरात पुष्पोत्सव

0
IMG-20260417-WA0032
Spread the love

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट

पुणे : वसंत ऋतु मध्ये बहरलेली जाई जुई, मोगरा, लिली, शेवंती, सोनचाफा, तगर, निशिगंध शोभिवंत फुलांची आरास… सुवासिक फुलांनी साकारलेले विविध हार… मोग-याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या तब्बल २५ लाख फुलांची सजावट बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली. दत्तमंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन सत्तू अमावस्येला करण्यात येते. ही फुलांची मनोहरी आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

सकाळी उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांचे हस्ते पारंपरिक लघुरूद्र करण्यात आला. अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार आणि उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ यांचे हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व माजी विश्वस्त डॉ. विठ्ठल नेउरगांवकर यांचे हस्ते सायं आरती करून भाविकांना चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ, पन्हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, खजिनदार युवराज गाडवे, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, सुनिल रुकारी, डॉ. पराग काळकर आणि राजेंद्र बलकवडे उपस्थित होते.

अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, मंदिरात यंदा २५ लाख फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये मोगरा, झेंडू, गुलाब, गुलछडी, लिली फुले, चाफा फुले, जाई-जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै.लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. रविवार, दिनांक २१ एप्रिल पर्यंत भक्तांकरीता ही आरस पाहण्यास खुली राहणार आहे.

फोटो ओळ – कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्यावतीने संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन सत्तू अमावस्येला करण्यात येते. ही फुलांची मनोहरी आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी