संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून जागविली देशभक्तीची भावनाजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सृजनसभेच्या वतीने राज्यस्तरीय आंतरशालेय संगीत-नृत्य करंडक स्पर्धा ; देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि सृजनसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरशालेय प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर संगीत-नृत्य करंडक स्पर्धेत संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जागविली. विविध शाळा व महाविद्यालयांतून आलेल्या स्पर्धकांनी राष्ट्रप्रेमाचा सुरेल व तालबद्ध आविष्कार सादर केला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील नुकताच संस्थेच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये पार पडला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. स्पर्धेत ‘देशभक्ती’ या विषयावर आधारित समूहगीत गायन, समूह नृत्य तसेच छोटा ख्याल गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
इयत्ता पाचवी ते बारावी, १८ ते २१ वयोगट तसेच खुल्या गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना धनादेश, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्यभरातील शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून देशभक्तीची भावना प्रभावीपणे मांडली.
ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडतो. तसेच आजच्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत होण्यासोबत आपल्या कला जोपासण्याची मूल्ये देखील रुजतात.
