बांधकाम उद्योगाच्या सुरक्षित भविष्यासाठी नवोन्मेष आवश्यक
- ‘कन्स्ट्रो २०२६’ प्रदर्शनात ‘भारतीय बांधकाम उद्योगाचे भविष्य’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर
पुणे : “बांधकाम व्यवसायाचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर नवोन्मेष स्वीकारून विद्यमान समस्यांवर उपाय शोधणे अत्यावश्यक आहे. बांधकाम उद्योगात सिमेंटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे पर्यावरणावर प्रचंड ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी सिमेंटऐवजी फ्लाय ऍशसारख्या पर्यायांचा विचार केला पाहिजे,” असे प्रतिपादन जे. कुमार डिफेन्स अँड एअरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी युसूफ इनामदार यांनी केले.
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कन्स्ट्रो २०२६’ या चार दिवसीय विसाव्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ‘भारतीय बांधकाम उद्योगाचे भविष्य’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात आयोजित कार्यक्रमावेळी ‘कन्स्ट्रो २०२६’चे चेअरमन जयदीप राजे, शुभम ईपीसीच्या संचालिका अर्चना बडेर, इंडिया प्लम्बिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुभाष देशपांडे, प्रीकास्ट इंडिया इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अजित भाटे, ‘पीसीईआरएफ’चे उपाध्यक्ष जयंत इनामदार आदी उपस्थित होते.
बांधकाम उद्योगाचा आढावा घेताना इनामदार यांनी नमूद केले की, पुणे शहरात दरवर्षी सुमारे आठ दशलक्ष टन सिमेंट वापरले जाते. सिमेंटसोबतच मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचाही वापर होतो. त्यामुळे सिमेंटऐवजी फ्लाय ऍशचा आणि पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करायला हवा. नवोन्मेष, प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विविध बांधकाम प्रकल्प कमी कालावधीत पूर्ण होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
सुभाष देशपांडे म्हणाले, “शासनाची धोरणे अधिक कठोर होत असल्याने बांधकाम उद्योगाला प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करावाच लागेल. नव्या धोरणानुसार विकासकांना पाण्याचा ताळेबंद (वॉटर बॅलन्स शीट) सादर करणे बंधनकारक आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठवण्यासाठी सायफॉनिक पाइप्सच्या वापराला प्रोत्साहन द्यायला हवे. तसेच नळांमधील पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याचा वापर निम्म्याहून अधिक कमी करता येऊ शकतो.”
अर्चना बडेर म्हणाल्या, “भारतीय बांधकाम उद्योगाची सुरुवात मजुरीवर आधारित पद्धतीने झाली. त्यानंतर स्वयंचलनाचा टप्पा आला आणि आता आपण ‘रिअल-टाइम’ युगात आहोत. वेग, गुणवत्ता आणि मजबुती साधण्यासाठी काळानुरूप बदल स्वीकारणे गरजेचे आहे.”
जयंत इनामदार यांनी स्ट्रक्चरल स्टीलचा वापर करण्याचा सल्ला दिला. संरचनात्मक स्टीलमुळे कार्पेट क्षेत्रात सुमारे ४० टक्क्यांनी वाढ होते. वेळेची बचत होते आणि त्यातील ८० ते ९० टक्के साहित्य पुन्हा वापरता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित भाटे यांनी ‘प्रीकास्ट कॉलम आणि भिंतींचा वापर करून वेळ वाचवता येतो आणि गुणवत्तेत सातत्य राखता येते’ असे सांगितले. जयदीप राजे यांनीही विचार मांडले.
या सत्राला तरुण अभियंते, अभियांत्रिकीचे विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
