सिंहगड रस्त्यावर नशामुक्त भारताकरिता तरुणाईने दिला दारु सोडा, दूध प्या चा नाराजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे आयोजन ; तब्बल १ हजार लीटर दुधाचे वाटप
पुणे : मद्यपान म्हणजे मनोविकार, दारू सोडण्याचा करा निर्धार… आरोग्याची धरू साथ, मद्यपानावर करू मात… दारू सोडा, जीवन वाचवा… अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून नशामुक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश तरुणाईतर्फे देण्यात आला. सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिका-यांसह, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता पुढाकार घेत दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नऱ्हे पोलीस स्टेशन तर्फे दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी हवेली पंचायत समितीच्या सभापती प्रभावती ताई भूमकर, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाइंगडे, नऱ्हे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, माजी नगरसेवक हरिदास चरवड, पोलीस उपनिरीक्षक नम्रता सोनवणे, भूपेश साळुंखे, संतोष भांडवलकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश बरकड, सागर कोल्हे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, त्यामुळे याविरोधात जनजागृती करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम आवश्यक आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे. मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम सुरु असून यंदा मुलींचा मोठ्या प्रमाणात या जनजागृतीमध्ये सहभाग आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.
- फोटो ओळ : सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट्स, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, नऱ्हे पोलीस स्टेशन तर्फे दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
