January 19, 2026

सचिन पिळगावकर यांचा शायराना अंदाज,अन वैभव जोशी यांचा ‘सोबतीचा करार’

0
IMG-20251229-WA0034
Spread the love
  • दिवसभर रंगलेल्या ‘आईना- ए-गजल’ मैफलीने जिंकली पुणेकरांची मने

पुणे: ‘मै कतराही सही, मेरा वजूद तो है, दुवा करे जो समंदर मेरी तलाश मे है’ अशा आत्मविश्वासाने अस्खलित उर्दूमधून सादर केलेल्या गजल, नज्म, मुक्तके यांतून अष्टपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांचा शायराना अंदाज-ए-बया’ रसिकांसमोर आला आणि या अष्टपैलू कलाकाराला रसिकांनीही भरभरून दाद दिली. पाठोपाठ कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ या मराठी गजल, कविता, नज्म सादरीकरणाने ‘आईना-ए-गजल’च्या रंगतीचा कळस गाठला. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.

निमित्त होते, डाॅ. विनय वाईकर स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘आईना-ए-गजल’ या विशेष मैफलीचे. नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात दिवसभर रसिकांनी शायरीचे विविध रंग शब्दसुरांच्या साथीने अनुभवले. यावेळी सचिन पिळगावकर यांच्या हस्ते डाॅ. वाईकर लिखित ‘आईना-ए-गजल’ आणि ‘गुलिस्ता-ए-गजल’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रसंगी कवी वैभव जोशी, संयोजक अमित वाईकर, अपर्णा वाईकर, गजलकार सुरेशकुमार वैराळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

‘अंदाज-ए-शायरी’मधून सचिन यांच्यातील उर्दूप्रेमी शायराचे आणि कलावंताच्या संवेदनशीलतेचेही दर्शन घडले. अमित वाईकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उर्दूविषयीचे प्रेम अभिनेत्री मीनाकुमारी आणि शायर मजरूह सुलतानपुरी या गुरुंमुळे निर्माण झाले. उर्दूचे चाहते इतके जास्त आहेत, की इसे गैरमुस्लिम संभाले हुए है, असे म्हणावेसे वाटते, या त्यांच्या विधानाला उर्दूप्रेमींनी टाळ्याच्या कडकडाटात पसंती दर्शवली. स्वतःच्या काही गजल, नज्म, सुटे शेर तसेच विनोदी ढंगाने लिहिलेल्या काही रचनाही सचिन यांनी सादर केल्या. ‘आजकल चलता है खूब मेरा बोलबाला, मुझको बुरा कहनेवाले, तेरा मुह काला’ अशी हलकीफुलकी रचनाही त्यांनी समाजमाध्यमांच्या संदर्भात पेश केली.

‘आईना-ए-गजल’ मैफलीची सुरवात ‘मुशायरा गझलरंग’ या सादरीकरणातून कवी वैभव जोशी, वैभव देशमुख, ममता सपकाळ आणि ज्ञानेश पाटील यांनी केली. सूत्रसंचालन सुरेशकुमार वैराळकर यांनी केले. दुसऱ्या सत्रात राजेश रेड्डी यांनी ‘बज्म-ए-सुखन’ या प्रस्तुतीतून पुढे आणले. शायरीतून वेगळा विचार सांगत रेड्डी यांनी ‘किसी दिन ज़िंदगानी में करिश्मा क्यों नहीं होता, मैं हर दिन जाग तो जाता हूँ ज़िंदा क्यों नहीं होता, यूँ देखिए तो आँधी में बस इक शजर गया, लेकिन न जाने कितने परिंदों का घर गया’ ही गजल सादर केली.

तिसऱ्या सत्रात गायिका प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी ‘नग्मा-ए-गजल’च्या माध्यमातून गजल पेश केल्या. नियत ए शौक़ भर न जाए कहीं (नासिर काज़मी), मेरे हमनफ़स मेरे हमनवा (शकील बदायुनी), रोज़ सवेरे दिन का निकलना, शाम में ढलना जारी है (राजेश रेड्डी), यूं हसरतों के दाग़ मोहब्बत में धो लिए (चित्रपटगीत), अचानक फोन येतो अन् अचानक मन तरल होते (वैभव जोशी), आज जाने की ज़िद ना करो, अशा गजलची प्राजक्ता यांची पेशकश रसिकांच्या अंतःकरणाच्या तारा छेडणारी होती. त्यांना महेश साळुंके (तबला), निनाद सोलापूरकर (संवादिनी) व प्रभंजन पाठक (व्हायोलिन) यांनी अनुरूप संगत केली.

या मैफलीची सांगता रसिकांच्या तुडुंब गर्दीत होती. कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या सादरीकरणाला निनाद सोलापूरकर (कीबोर्ड), प्रसाद जोशी (ढोलक, पखवाज), समीर शिवगार (तबला), मिलिंद शेवरे (गिटार), दत्तप्रसाद रानडे (गायन) तसेच संगीतकार डॉ. आशिष मुजुमदार या सहकलाकारांमुळे गहिरे रंग चढले. ‘सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू’ इथून सुरू झालेला हा प्रवास, वन्समोअरची दाद घेत, ‘कुठंतरी कायतरी चुकतंय यार’, ‘मी तुला पाहिले, तू मला पाहिले’, ‘फार झाल्या आता ओळखीपाळखी’, ‘सांग कुठवर पांघरावी शब्दवर्खी झूल आता’, ‘आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई’ असे टप्पे घेत ही मैफल भैरवीवर विसावली.

फोटो ओळ:
८०८३- नवी पेठ: ‘आईना-ए-गजल’मध्ये सादरीकरण करताना डावीकडून ज्ञानेश पाटील, वैभव देशमुख, ममता सपकाळ, वैभव जोशी आणि सुरेश वैराळकर.
८८७२- नवी पेठ: ‘आईना-ए-गजल’ प्रकाशनावेळी डावीकडून अपर्णा वाईकर, अमित वाईकर, सचिन पिळगावकर, सुरेश वैराळकर आणि वैभव जोशी.
८९६४- नवी पेठ: ‘आईना-ए-गजल’मध्ये सादरीकरणावेळी अमित वाईकर व सचिन पिळगावकर.
९४६६- नवी पेठ: ‘आईना-ए-गजल’मध्ये सादरीकरणावेळी दत्तप्रसाद रानडे, वैभव जोशी व कलाकार
९४७०- नवी पेठ: ‘आईना-ए-गजल’मध्ये सादरीकरणावेळी ममता सपकाळ, वैभव जोशी, सचिन पिळगावकर, प्राजक्ता शिंदे, सुरेश वैराळकर, दत्तप्रसाद रानडे, राजेश रेड्डी व अमित वाईकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button