मोरपीस आणि पिंपळपान’ यामध्ये जीवनातील सौंदर्य आणि वास्तवाचा सुरेख संगमज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म.जोशी ; ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन ; भारत इतिहास संशोधक मंडळाला १ लाख रुपयांची देणगी
‘
पुणे : गेल्या ५० ते ७० वर्षांमध्ये जीवनप्रणालीचे चित्र बदलले आहे. खेडी ओस पडली आणि शहरे भरभरून गेली. आता सारेच बदलले आहे. जीवनशैलीतील हे बदल ‘मोरपीस आणि पिंपळपान’ या ललित लेखसंग्रहामध्ये उत्तमपणे टिपले आहेत. यानिमित्ताने वाचकांना जीवनातील सौंदर्य आणि वास्तव याचा सुरेख संगम अनुभवयाला मिळेल, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.
स्मिता टाईपसेटर्स, पुणे आणि डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. रामचंद्र परांजपे लिखित ‘मोरपीस आणि पिंपळपान’ ललित लेख संग्रहाचे प्रकाशन सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात झाले. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सुधीर गाडगीळ, लेखक डॉ. रामचंद्र परांजपे, स्मिता टाईपसेटर्सचे हेमंत जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ. रामचंद्र परांजपे यांचे वडील अॅड.वि.रा.उर्फ बापूसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ भारत इतिहास संशोधक मंडळाला १ लाख रुपयांची देणगी डॉ. रामचंद्र आणि रमा परांजपे यांनी मंडळाचे पांडुरंग बलकवडे यांच्याकडे दिली.
सुधीर गाडगीळ म्हणाले, ललित लेख संग्रहातील शीर्षक अतिशय उत्तमरीतीने देण्यात आली आहेत. सोप्या मराठीमध्ये आयुष्याचे धावते वर्णन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. वाचकांची उत्सुकता वाढविणारे हे पुस्तक असून रेखाचित्रांमुळे याला अधिकच उठावदारपणा आला आहे.
डॉ. रामचंद्र परांजपे म्हणाले, लेखाचे आशयानुरूप शीर्षक, सुंदर आणि अर्थपूर्ण रेखाचित्रे तसेच विविधांगी संस्कृतीचे दर्शन वाचकांना घडविण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे. या ललित लेखसंग्रहामध्ये २७ लेखांचा अंतर्भाव आहे. आपले सणवार, परंपरा, जीवनशैली याबाबतचे अनेक संदर्भ लेखांमध्ये आहेत. लेख संग्रहातील वर्णनशैली प्रासादिक आणि सहजसंवादी आहे. यामुळे वाचनापर्यंत यातील संदेश सहजपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत जोशी यांनी स्वागत केले. अधिश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.
- फोटो ओळ : स्मिता टाईपसेटर्स, पुणे आणि डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे लिखित ‘मोरपीस आणि पिंपळपान’ ललित लेख संग्रहाचे प्रकाशन सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर.
