-ज्ञानाशिवाय भक्तीला पूर्णत्व नाहीश्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) : सावकार बुवा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन सावकार बुवा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
पुणे : कीर्तन ही एक भक्ती आहे. भक्ती करण्याचे देखील ज्ञान असायला हवे आणि त्याप्रमाणे कृती हवी तरच ती भक्ती होते. ज्ञानाशिवाय भक्ती पूर्णत्वाला जात नाही. देवाच्या भक्तीचेही मोजमाप असते. क्रोध, लोभ, मोह कमी होत गेला की भक्ती वाढते. भक्तीमध्ये मुरून राहिलो की त्याला मुक्ती म्हणतात. ज्ञानाशिवाय मुक्तीला जाता येणार नाही. त्यामुळे ज्ञानाची गरज आहे. सगुणाची उपासना करत असताना लक्ष निर्गुणाकडे ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांनी केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने व वै. ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित पुणे कीर्तन महोत्सवात ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची कीर्तनमाला ऐतिहासिक लालमहाल येथे आयोजित करण्यात आली होती.
या महोत्सवादरम्यान कीर्तनकोविद ह. भ. प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. विष्णुपंत रामकृष्ण चिद्रवार उर्फ सावकार बुवा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कीर्तनकार ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, प्राध्या. संगिता मावळे, ह. भ. प. मंगलमूर्ती औरंगाबादकर यावेळी उपस्थित होते.
मानाचे वस्त्र, पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह व रोख ११ हजार असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप होते. अक्षदा ईनामदार यांनी सूत्रसंचालन केले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त सलग तीन दिवस ह.भ.प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची वारकरी कीर्तने झाली.
- फोटो ओळ : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे व सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म सार्धसप्तशती वर्षानिमित्त श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांच्या शुभाशीर्वादाने व वै. ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांच्या स्मरणार्थ आयोजित पुणे कीर्तन महोत्सवात ह. भ. प. डॉ. यशोधन महाराज साखरे यांची कीर्तनमाला ऐतिहासिक लालमहाल येथे आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवादरम्यान कीर्तनकोविद ह. भ. प. स्व. कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांच्या हस्ते ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. विष्णुपंत रामकृष्ण चिद्रवार उर्फ सावकार बुवा यांना प्रदान करण्यात आला.
