स्व-रूपवर्धिनीला यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कारवंचित समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव ; संपदा सहकारी बँक लि. तर्फे आयोजन
पुणे : सेवाभावी संस्थांच्या कार्याचा सन्मान करून ते महत्कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कार स्व-रूपवर्धिनी संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दि.३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष सी.ई.अश्विनीकुमार उपाध्ये यांनी दिली.
संपदा सहकारी बँक लि. तर्फे आयोजित कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष ऍड.एस.के.जैन हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर, भारत-भारतीचे संस्थापक अध्यक्ष विनय पत्राळे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. तसेच बँकेचे अध्यक्ष सी.ई.अश्विनीकुमार उपाध्ये, उपाध्यक्ष सी.ए. महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे यांसह संपूर्ण संचालक मंडळ कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
अनेक दशके पुण्यातील वंचित समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल स्व-रूपवर्धिनी संस्थेला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
