वंदे मातरम गीताच्या दिडशे वर्ष पूर्ती निमित्त बुधवारीपरमवीर चक्र विजेते योगेंद्र यादव यांचे व्याख्यान
पुणेः- हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड कल्चरल ट्रैनिंग फौंडेशन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्या बद्दल २१ परमवीर चक्र विजेत्यांना वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . परमवीर चक्र विजेते कारगिल युद्धाचे नायक योगेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० (साडेअकरा) वाजता, एम्फी थिएटर फर्ग्यूसन महाविद्यालय, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे . हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि महामंत्री किशोर येनपुरे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य श्याम मुडे, उपप्राचार्य डॉ. डी. डी. कुंभार, उपाध्यक्ष संजय भोसले,चरणजित सिंग, राधेश्याम अग्रवाल, सहमंत्री संदीप सारडा, शैलेंद्र प्रधान, राहुल जाधव,मनु राजन, सुधांशु एरंडे, कीर्ती कोल्हटकर, सोनिया श्रॉफ उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डेक्कन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रावत भूषविणार आहेत.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवर वीर सावरकरांच्या खोलीला भेट देणार आहेत.
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था ही मठ मंदिरांच्या माध्यमातून समाजामध्ये सेवा कार्य करण्याचे काम करते. तर इनिशिएटिव्ह फॉर मॉरल अँड ट्रेनिंग फौंडेशन ही संस्था शाळा आणि महाविदयालयांमध्ये वृक्षारोपण, वन्य प्राण्यांचे रक्षण, नदी स्वच्छता, नारी सन्मान, मातृ पितृ वंदन, गुरु वंदन, कन्या वंदन आणि राष्ट्र भक्ती जागरणासाठी परमवीर चक्र वंदन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. माता अमृता नंदमयी शाळा निगडी आणि संत मदर तेरेसा विद्यालय वडगावशेरी या शाळांमध्ये देखील परमवीर चक्र वंदन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे योगेंद्र यादव ह्यांच्या हस्ते सायंकाळी 6 वा महा आरतीचे आयोजन केले आहे.
