गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील ३७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील ३७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, विजय भालेराव यांसह डॉ. संजीव डोळे आदी उपस्थित होते. शिबीरात २९८ विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी व २३१ विद्यार्थ्यांची दंततपासणी करण्यात आली.
सूर्यकांत पाठक म्हणाले, समाजात जे गुणवत्तापूर्ण असते, त्याची किंमत सर्वाधिक असते. त्याचप्रमाणे जी व्यक्ती जास्त काम करते आणि ज्याची क्षमता जास्त आहे, त्याला जास्त किंमत मिळते. मात्र, समाजात अशी काही कामे आहेत, ज्यांचे मूल्य पैशात करता येत नाही. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे विश्वस्त, पालकत्व योजनेतील शिक्षक आणि डॉक्टर यांचे योगदान अमूल्य असून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे मूल्य पैशात होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी देखील मोठे झाल्यावर इतरांसाठी असेच कार्य करावे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, सन २०१० मध्ये ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिक अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते. भारत विश्वगुरु होण्यास शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात मोठे कार्य करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे लहान मुलांचे डोळे, दात यांसह संपूर्ण आरोग्याची तपासणी शिबीरात केली जाते. तसेच या मुलांचे आरोग्यविषयक रेकॉर्ड देखील ठेवले जाते. मुलांनी आहारासोबत व्यायाम देखील करायला हवा. मानसिक तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, हे देखील मुलांना या शिबिराद्वारे सांगण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
योजनेतील विद्यार्थी तन्मय कबाडे म्हणाला, मी २०१७ मध्ये या योजनेत आलो. माझ्याघरी सुविधा मर्यादित होत्या, मात्र माझे स्वप्न मोठे होते. योजनेत आल्यावर तू सक्षम आहेस, ही जाणीव मला मिळाली. निरोगी आरोग्यासह आत्मविश्वासाने मी आज उभा असून डिप्लोमाच्या दुस-या वर्षाला आहे. याचे श्रेय दगडूशेठ गणपती ट्रस्टला जाते.
योजनेतील विद्यार्थीनी श्रद्धा चिन्नी म्हणाली, इयत्ता २ री पासून मी या योजनेत आहे. आपले शारिरीक आरोग्य चांगले असेल, तर अभ्यासात लक्ष लागते. आपल्या प्रत्येकाचे जीवन आव्हानात्मक असून आरोग्य तपासणी महत्वाची आहे. मी बीएससी इलेक्ट्रॉनिक यावर्षी झाले. मला या प्रवासात आलेल्या आरोग्यासह सर्व अडचणीत ट्रस्टने साथ दिल्याने मी यशस्वी होऊ शकले, असेही तिने सांगितले.
- फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश पालकत्व योजनेतील ३७८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेच्या प्रांगणात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
