बहुश्रुत माणूस मोलाचा मानून पुलंनी केली परिणामकारक शब्दपेरणीग्लोबल पुलोत्सवात उलगडले ‘काळापुढचे पुलं’
पुणे : पु. ल. देशपांडे यांच्यावरील परंपरावादाचा आरोप योग्य नाही. पुलं कधीच प्रतिगामी नव्हते. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे व्यक्तिमत्व होते. श्रोत्यांना चांगले ऐकण्याची, बघण्याची आणि वाचनाची सवय लावण्यात पुलंचा मोलाचा वाटा आहे. बहुश्रुत माणूस मोलाचा असे मत मांडत आपल्या साहित्यातून त्यांनी थोडक्यात परंतु परिणामकारक शब्दपेरणी केली. भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास असला तरी पुलंचे परिप्रेक्ष्य विस्तारित होते. आव्हाने पेलून जोखमीचे काम करत तंत्रज्ञानाचा अवलंब देखील पुलंनी सहजतेने स्वीकारला. परंपरा जपत असले तरीही त्यांचा जग जाणून घ्यायचा आवाका मोठा होता, अशा शब्दात ‘काळापुढचे पुलं’ उलगडत गेले.
निमित्त होते कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आयोजित ग्लोबल पुलोत्सवाचे. पुलोत्सवात आज (दि. 7) ‘काळापुढचे पुलं’ या विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनंदन लेले आणि पुणे आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी गौरी लागू यांचा यात सहभाग होता. त्यांच्याशी ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले यांनी संवाद साधत पुलंविषयी आठवणी सांगितल्या. बालगंधर्व कलादालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कमीतकमी शब्दात परिणामकारक बोलणे हे वैशिष्ट्य..
सुनंदन लेले म्हणाले, पुलं उत्तम निवेदक होते. आपल्याकडील अभ्यासपूर्ण माहितीची भारंभार पेरणी न करता ते निवेदनातून विषय उत्तमरित्या गुंफत असत. कमीतकमी शब्दात परिणामकारक बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वभावात हरण्याची भीती कधीच नव्हती. तसेच एकटे पडण्याची भीती त्यांना शिवली नाही कारण त्यांनी मैत्र जपत प्रेमही केले. डोळस माणूस ऐकतो आहे, असा विचार न करता श्राव्य माध्यमातून संकल्पना मांडताना कल्पकता प्रभावीपणे वापरून कला साकार करणे याविषयी पुलंनी काळाच्या पुढे जाऊन विचार केला होता. प्रतिभा जगताना तंत्रज्ञानाचा कधीही अव्हेर केला नाही.
शुद्ध भाव जपणारे पुलं एक सुखात्माच होते..
गौरी लागू म्हणाल्या, अनेक माध्यमांमध्ये त्यांनी काम केले. माध्यमांच्या प्रभावाविषयी दूरदृष्टी ठेवून त्यांनी अनेक प्रकारचे नियोजन केले. माध्यमांची घडी बसविली. प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रम चांगल्यात चांगला व्हावा म्हणून ते प्रयत्नशील असत. श्राव्य माध्यमातही दृश्यात्मकता निर्माण होणे आवश्यक आहे, हे विचार त्यांच्या द्रष्टेपणाचे लक्षण होय. जोखमीचे काम करतानाही राष्ट्राच्या प्रतिभेचा विचार करणारी व्यक्ती म्हणून पुलंचे कार्य मोलाचे आहे. शुद्ध भाव जपणारे पुलं एक सुखात्माच होते.
पुलंच्या नजरेतून महाराष्ट्राने जग पाहिले..
मंगला खाडिलकर पुलंच्या आठवणी सांगताना म्हणाल्या, पु. ल. देशपांडे यांनी माध्यमांचा खुबीने वापर करत श्रोत्यांना शहाणपण दिले. ते नवोन्मेषाचा काळ साकारणारे सादरकर्ते होते. प्रतिभावंतांना काळाची मर्यादा नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुलं होय. माध्यमांची शक्ती वापरण्याचे कसब, त्यासाठी मिळालेली अंत:स्फूर्ती कळण्याची प्रतिभा पुलंकडे होती. विस्तारित परिप्रेक्ष्य लाभलेले त्रिकालदर्शी साहित्यिक, नाटककार, अनेक माध्यमे हाताळणारे अवलिया होते. महाराष्ट्राने काही काळ पुलंच्या नजरेतून जग पाहिले. असे श्रेष्ठत्व लाभलेला कलाकार म्हणजे पुलं होय.
मान्यवरांचे स्वागत सतीश जकातदार यांनी केले. तर सूत्रसंचालन स्नेहल दामले यांचे होते.
फोटो ओळ : पुलोत्सवात आयोजित ‘काळापुढचे पुलं’ संवादात्मक कार्यक्रमात सहभागी गौरी लागू, मंगला खाडिलकर, सुनंदन लेले.
प्रति,
मा. संपादक
कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आयोजित ग्लोबल पुलोत्सवात आज (दि. 7) ‘काळापुढचे पुलं’ या विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
वीरेंद्र चित्राव, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801
