January 19, 2026

सरदार पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त२ नोव्हेंबरला ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉन

0
IMG-20251009-WA0035
Spread the love
  • केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे: भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची यंदा १५० वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी स. प. महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथे ‘पुणे रन फॉर युनिटी’, महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे, अशी माहिती केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. प्रसंगी विशाल सातव, मनोज एरंडे, अमोल कविटकर, रमेश परदेशी, योगेश यावलकर, अरविंद बिजवे आदी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “हा उपक्रम सर्व वयोगटातील नागरिकांना फिटनेस, एकता आणि राष्ट्रीय सलोखा या मूल्यांभोवती एकत्र आणणारा मोठा सार्वजनिक क्रीडा सोहळा ठरणार आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरदार पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात ‘रन फॉर युनिटी’ (राष्ट्रीय एकता दौड) या उपक्रमाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला नवी दिल्ली, त्यानंतर मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, चंदीगड, जयपूर आणि लखनऊ या प्रमुख शहरांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला आहे. यंदा पुण्यात प्रथमच राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात येत असून, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कुठलेही मूल्य आकारले जाणार नाही; परंतु आपले नाव रजिस्टर / नोंदवणे बंधनकारक आहे.”

यावर्षीच्या ‘पुणे रन फॉर युनिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह अंदाजे २०,००० धावपटू सहभागी होणार आहेत. केनिया, इथिओपिया इत्यादी देशांतील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटूंना आमंत्रित केले आहे व त्यातील काही धावपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. तसेच भारत देशातील नामांकित राष्ट्रीय धावपटूंना देखील आमंत्रित केले आहे. विजेत्यांसाठी एकूण १० लाखांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. २१ कि.मी. श्रेणीत विजेत्या पुरुष व महिला खेळाडूंना प्रथम परितोषिक प्रत्येकी १,००,००० देण्यात येणार आहे.

पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या ध्येयाला प्रत्यक्ष हातभार लावावा, तसेच सहभाग व नोंदणीसाठी सोबत दिलेल्या क्यूआर कोडचा उपयोग करावा, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मॅरेथॉनमध्ये चार मुख्य धाव श्रेणी

  • २१ कि.मी.- हाफ मॅरेथॉन (टायमिंग चिपसह)
  • १० कि.मी.- स्पर्धात्मक धाव (टायमिंग चिपसह)
  • ५ कि.मी.– फन रन
  • ३ कि.मी.– फॅमिली व बिगिनर रन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button