January 20, 2026

आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणाधनगरांनी सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करावीलढवय्या धनगर समाजाने ‘ओबीसी’चे नेतृत्व करावे

0
IMG-20251005-WA0075
Spread the love
  • ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन; सकल धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन

पुणे : धनगर समाज लढवय्या, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत लढवय्यापण दाखवायला हवे. समाजाची सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करायला हवी. सत्तालोलुप राजकारण्यांनी धनगरांचा, ओबीसींचा वापर करून सत्ता मिळवली आणि तुम्हाला प्रवाहाबाहेर फेकले. आरक्षण हा उन्नतीचा मार्ग असून, तो सुरक्षित ठेवायचा असेल, तर धनगरांनी सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांचे नेतृत्व करावे. आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवादी समूहांची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी सर्वानी एकजूट व्हा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यापुढे माझे मत ओबीसी, आरक्षणवादी किंवा मुस्लिमांनाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात आयोजित कार्यक्रमावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे नेते डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्राप्तिकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, संयोजक ॲड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते, संतोष शिंदे, यशपाल रायभोगे, ज्ञानेश्वर नरुटे, गणेश सोनटक्के, गणेश दुगाने, धुळदेव टेळे, अनुजा जानकर, शंकर ढेबे, महादेव वाघमोडे, संतोष ढवळे, शालिनी शिंदे, ॲड. शिवाजी मदने, संतोष वरक, रमेश टकले, यशवंत गोवेकर, मनिषा दुगाणे, रसिका माने, प्रियंका सोनटक्के, अहिल्या गोफणे, स्वाती देवकाते, पूजा सोलनकर, स्वाती लवटे, अर्चना लाळगे, सुरेखा खरात, मनिषा मदने आदी उपस्थित होते.

यावेळी अहिल्यारत्न पुरस्कार वितरण, तसेच आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. बापूसाहेब शिंदे (सामाजिक कार्य), रामककिसन रौंदळे (शैक्षणिक), जयश्री वाक्षे (आरक्षण लढा), रुपाली जोशी (सेवाभावी संस्था), डॉ. सोमनाथ सलगर (वैद्यकीय सेवा), घनश्याम हाके (आदर्श समाजयुवक), भारत कवितके (पत्रकारिता), रामभाऊ लांडे (इतिहास संशोधन / साहित्य), कु. अक्षता ढेकळे (क्रीडा), डॉ. स्नेहा सोनकाटे (राजकीय), सुरेखा चौरे-गावडे (शासकीय सेवा), विवेक बिडगर (आदर्श उद्योजक), सैनाली गंगाराम उचाळे (महिला संघटन), धुळाभाऊ कोकरे (आधुनिक शेती), दत्ताभाऊ डोंबाळे (कामगार क्षेत्र), मुकुंद कुचेकर (वधू-वर परिचय उपक्रम), कु. यशोदा नाईकवडे (युवा व्याख्याते / प्रबोधनकार), सुनीता अर्जुन, रेखा धनगर-नरोटे (बास्केट बॉल) यांना सन्मानित करण्यात आले.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “अहिल्यादेवी होळकर यांना धार्मिकतेमध्ये अडकवून ठेवण्याचे काम झाले. खरेतर त्या राज्यकर्त्या म्हणून महान आहेत. महापुरुषांनी घडवलेले हे राज्य त्यांचे विचार अंमलात आणतय का?, यावर विचार केला पाहिजे. इमानदार राज्यकर्ते मिळत नाहीत, समाज केवळ अनुकरण करण्यावर भर देतोय, हे अयोग्य आहे. राज्य करणारा समाज म्हणून धनगरांची ओळख निर्माण व्हायला हवी. होळकरांचा उज्ज्वल इतिहास समोर आणण्याचे काम आपल्याला करावे लागेल.”

“धनगर आणि धनखड हे वेगळे असल्याचे सांगून आपला अधिकार हिरावला आहे. १९५० पासून १९९० पर्यंत जवळपास ४० वर्षे आपल्याला आरक्षणापासून वंचित राहावे लागले. मिळालेल्या आरक्षणातही कुणबी-मराठ्यांना घुसवण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकप्रकारे ओबीसी आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे. त्यामुळे तेलंगण व तामिळनाडूप्रमाणे ओबीसी समाजाने सत्ता काबीज करून २७ टक्के आरक्षण ६०-७० टक्क्यांवर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.

डॉ. विकास महात्मे म्हणाले, “धनगर समाज आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी नेहमीच एकवटलेला आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही. धनगर समाजाने शिक्षण, संघटन आणि हक्क यांची त्रिसूत्री अंगीकारली पाहिजे. समाजातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले तर आरक्षण आणि आर्थिक उन्नतीचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकसंघ व्हावे.”

प्रास्ताविकात ॲड. विजय गोफणे यांनी अधिवेशनाचे स्वरूप विशद केले. ‘आर्थिक सक्षमीकरण, उद्योगाच्या संधी व गरज, संस्थात्मक निर्मिती’, ‘सामाजिक सुधारणा, रूढी व परंपरा, विवाह पद्धती बदल, प्रबोधन व शैक्षणिक सुधारणा’, ‘समाज संघटन, संघटनात्मक संरचना, शाखा कार्यपद्धती, वार्षिक उपक्रम व नियोजन, केडर बांधणी’, ‘महिला सक्षमीकरण, चळवळीतला सहभाग, प्रबोधन व प्रशिक्षण, कुटुंब व्यवस्थापन आरोग्य, कायदे विषयक, प्रगतीच्या वाटा’, ‘नेतृत्व निर्मिती काळाची गरज राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व अन्य स्वरूपाच्या नेतृत्वाचा विकास’, ‘धनगर एसटी आरक्षण: वर्तमान स्थिती, भविष्यातील लढ्याचे नियोजन, छत्तीसगड प्रकरणाचे वास्तव’, ‘माध्यमातील धनगर समाजाचे स्थान, अडथळे, संधी, माध्यम हाताळणी, व्यवस्थापन व भागीदारी’ आदी विषयांवर चर्चासत्रे झाली.

माझे मत आरक्षणवाद्यांना: आंबेडकर
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत दलित, ओबीसी, आरक्षण समर्थक आणि मुस्लिम समाज यांचे हक्क धोक्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे माझे मत फक्त ओबीसी, आरक्षणवादी किंवा मुस्लिम उमेदवारांनाच असेल. आपल्याला विचारसरणीपेक्षा हक्क आणि अस्तित्व महत्त्वाचे आहेत. ज्यांनी समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे, त्यांनाच आपला पाठिंबा हवा. आज देशात समानता आणि सामाजिक न्याय टिकवण्यासाठी बहुजन, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाज एकत्र येणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्ष सामाजिक न्यायाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जनतेने आता विचारपूर्वक मतदान करून समाजहिताचे नेते निवडले पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button