January 20, 2026

महिलांना पाठिंबा आणि सन्मान देणे गरजेचेराज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मत : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे ‘नारी तू नारायणी’ या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

0
IMG-20251006-WA0036
Spread the love


पुणे : नवरात्रीत देवीने असुर शक्तीशी लढा दिला तेव्हा सर्व देवतांनी तिला आपापले शस्त्र दिले आणि लढ्यात पाठिंबा दिला. लढा संपल्यानंतर तिच्या उग्र रूपाला शांत करण्यासाठी भगवान शंकर तिच्या पायाखाली आले. या कथेतून हे स्पष्ट होते की देवी ही सर्व शक्तींची मूळ आहे आणि तिच्या पायाखाली भगवान शंकर येणे हे शक्ती, भक्ती आणि सन्मान याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, आज अहंकार बाजूला ठेवून महिलांना पाठिंबा देण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे, असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नारी तू नारायणी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या मीरा बडवे, सिस्टर ल्युसी कुरियन आणि पूजा मिसाळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पूर्वी महिलांचे कर्तृत्व अनेक अडथळ्यांमुळे मर्यादित होते, पण आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करत आहे. आज महिला पैसे कमवायला शिकल्या आहेत, पण ते कसे वापरायचे हे शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजही अनेक महिलांचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांच्या घरातील पुरुष पाहतात. महिलांनी केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम न होता, आर्थिक व्यवहारात स्वावलंबी झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्कार स्वीकारताना ल्युसी कुरियन म्हणाल्या, जेव्हा मला पुरस्कार मिळतो, तेव्हा मी परमेश्वराला विचारते की मी या योग्यतेची आहे का? ही गोष्ट मला प्रेरणा देते आणि मी आणखी मेहनत करते. आज माझं वय ७० आहे, तरीही मी पुढे काम करत राहणार आहे.
मीरा बडवे म्हणाल्या, माझ्या प्रत्येक मुली वेगवेगळ्या क्षेत्रात सक्षमपणे काम करत आहेत. मग त्यांना अनाथ किंवा अंध का म्हणावे? त्यांची प्रगती बघून मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. पूजा मिसाळ म्हणाल्या, आज पुरस्कार मिळाल्यावर वाटतं की आपण योग्य मार्गावर आहोत. आज ज्यांना पुरस्कार मिळाले आणि ज्यांनी ते पुरस्कार दिले, त्या दोघीही समाजातील इतरांसाठी काम करत आहेत. अशा व्यक्तींची प्रेरणा घेवून पुढे आणखी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले होते.

फोटो ओळ – सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने नारी तू नारायणी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाचा पुरस्कार मीरा बडवे, सिस्टर ल्युसी कुरियन आणि पूजा मिसाळ यांना प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button