श्री महालक्ष्मी मंदिरात ‘वंदे मातरम’ च्या स्वरांतून उलगडला राष्ट्राभिमानाचा प्रवासश्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ; मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन
पुणे : भारतमातेच्या स्तुती गीताचा इतिहास जिवंत करणारा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या पवित्र सभामंडपात सादर झाला. भारतभूमीला जननी मानणाऱ्या संत, स्वातंत्र्यसेनानी व जनतेच्या हृदयात दरवळणारा या स्तुती गीताचा इतिहास पुणेकरांसमोर जिवंत झाला.
निमित्त होते, सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमाचे. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य संग्रामाच्या रणघोषातून आजच्या राष्ट्रीय अभिमानापर्यंतचा ‘वंदे मातरम्’चा प्रवास या सांस्कृतिक सादरीकरणाने रसिकांच्या मनाला स्पर्शून गेला. कलाकार प्रदीप फाटक, चारुलता पाटणकर, अभिषेक खेडकर यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. सायंकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मंदिरावरील त्रिशक्ती महाल व विद्युतरोषणाईचे उद्घाटन झाले.
- फोटो ओळ : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मंदिरावरील त्रिशक्ती महाल व विद्युतरोषणाईचे उद्घाटन झाले.
