पुणे शहराची बायो इंजीनियरिंग हब अशी नवीन ओळख
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांचे प्रतिपादन : पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित पुण्याच्या वतीने स्व मोगो चाफेकर स्मरणार्थ जीवन गौरव पुरस्कार डॉ. गजानन एकबोटे यांना प्रदान
पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जातेच, त्याचबरोबर विद्येचे माहेरघर म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. आयटी हब म्हणून निर्माण झालेल्या प्रतिमेनंतर आता पुणे शहराला बायो डिझाईन आणि बायो इंजिनिअरिंग हब अशी नवी ओळख मिळत आहे. अलीकडील काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. ऊर्जा क्षेत्रात आणि वैद्यकीय क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, यावर येथे संशोधन आणि विचार सुरू आहेत, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणे च्या वतीने स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी च्या सभागृहात करण्यात आले. यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांना स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मो. गो. चाफेकर यांच्या कन्या हेमलता मराठे, प्रा. डॉ. ज्योत्सना एकबोटे, पतपेढीचे अध्यक्ष राज मुजावर, उपाध्यक्ष दत्तात्रय नाईक, खजिनदार पुष्पक कांदळकर, सचिव डॉ. कल्याण वाघ आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र, पंचविस हजार रुपयांचा धनादेश असे होते. यावेळी पतपेढीचे निवृत्त सभासद, गुणी पाल्य व गुणवंत सभासद यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देत डॉ.गजानन एकबोटे म्हणाले, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुचे अत्यंत महत्त्व आहे. परमेश्वर रागावला तर त्यातून आपल्याला तारणारा गुरु असतो; परंतु गुरु रागावला तर परमेश्वरदेखील आपल्याला तारू शकत नाही, अशी वचने आपल्या धर्मग्रंथांमध्ये आढळतात. मला यापूर्वी विविध क्षेत्रांतील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष आहे, कारण माझे गुरुवर्य यांच्या नावाने शिक्षक पतपेढीचा पहिला पुरस्कार मला मिळत आहे. हे मी माझे मोठे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले.
राज मुजावर यांनी सांगितले की, स्व. मो.गो. चाफेकर पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यंदा हा पहिला पुरस्कार गजानन एकबोटे यांना प्रदान करण्यात आला. पतपेढीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात असून, पुणेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही पतपेढी केवळ आर्थिक व्यवहार पुरती मर्यादित नसून शिक्षकांमध्ये सद्प्रवृत्ती विकसित करणारी आणि त्यांना मार्गदर्शन करणारी एकमेव पतपेढी म्हणून कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.
फोटो ओळ – पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित, पुणेच्या वतीने स्व. मो. गो. चाफेकर जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी च्या सभागृहात करण्यात आले. यावेळी पुरस्कारार्थी डॉ. गजानन एकबोटे यांना प्रदान करण्यात आला.
