तब्बल १५ ते २० हजार सापांना जीवनदान देणाऱ्या अवलिया सर्पमित्र संकेत बोरकर यांचा पुण्यात सन्मानश्री दत्तभक्त मित्र परिवार च्या वतीने आयोजन ; ऐतिहासिक दगडी नागोबा मंदिरात कार्यक्रम
पुणे : आपल्या प्रत्येकामध्ये प्राण्यांविषयी प्रेम असते. मात्र, ते व्यक्त करीत प्रत्यक्षात कृतीतून दाखवून देण्याची संधी काहींनाच मिळते. अशांपैकी एक अवलिया म्हणजे सर्पमित्र संकेत बोरकर. नारायणपूर येथील संकेत बोरकर यांनी आजपर्यंत १५ ते २० हजार सापांना जीवनदान दिले असून गेल्या १७ वर्षांपासून ते हे कार्य समाजसेवा म्हणून करीत आहे. नागपंचमीच्या निमित्ताने त्यांचा विशेष सन्मान पुण्यात करण्यात आला.
श्री दत्तभक्त मित्र परिवारच्या वतीने गणेश पेठेतील ऐतिहासिक दगडी नागोबा मंदिरात कार्यक्रम या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री दगडी नागोबा देवस्थानचे विश्वस्त संतोष कडेकर यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे संयोजन राम दहाड यांनी केले. यावेळी दत्तभक्त मित्र परिवारचे सुरेश कर्डीले, किशोर ईप्पे, महेशअण्णा गायकवाड यांची उपस्थिती होती.
संकेत बोरकर म्हणाले, आमच्या घरामध्ये आजी -आजोबांपासून सगळ्यांना प्राणीप्रेम आहे. आजपर्यंत मी १५ ते २० हजार साप पकडले असून त्यांना जंगलात सुखरूप सोडून दिले आहे. पुरंदर तालुक्यात मी हे काम करीत आहे. साप पकडताना तो माझ्या अंगावर आल्याच्या घटना झाल्या आहेत. मात्र, तेथे योग्य ती काळजी घेऊन सापाला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले, साप पकडताना लक्षपूर्वक काम केले पाहिजे. सर्पमित्र म्हणून आमची नोंदणी आहे. मात्र, सरकारने आम्हाला सुविधा द्यायला हव्या. आम्हाला दुखापत झाली, तर रुग्णालयात सुविधा द्यायला हव्या. मानधन व रुग्णालयात शासनाकडून खर्च मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
- फोटो ओळ : श्री दत्तभक्त मित्र परिवारच्या वतीने गणेश पेठेतील ऐतिहासिक दगडी नागोबा मंदिरात नारायणपूर येथील अवलिया सर्पमित्र संकेत बोरकर यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व सन्मानार्थी.
