January 20, 2026

अरुण काकतकर यांचे लेखन संदर्भश्रीमंत : विजय कुवळेकर

0
IMG-20250725-WA0014
Spread the love

अरुण काकतकर लिखित ‘व्यक्तकं’ आणि ‘रंगांना फुटले पंख’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : कला, संगीत, साहित्य, संस्कृतीसंबंधित विविध विषयांना स्पर्श करणारे, त्यांचे सूक्ष्म निरीक्षण मांडणारे संदर्भश्रीमंत लेखन अरुण काकतकर यांनी केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, लेखक विजय कुवळेकर यांनी केले. जीवनातील आणि निसर्गातील अनेक रंग काकतकरांच्या जीवनाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत मिसळून गेले आहेत, अशी टिप्पणही त्यांनी केली.

उत्कर्ष प्रकाशन प्रकाशित आणि अरुण काकतकर लिखित ‘व्यक्तकं’ आणि ‘रंगांना फुटले पंख’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन कुवळेकर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २४) झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, अभिनेत्री, दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, अरुण काकतकर, प्रकाशक सु. वा. जोशी, निसर्ग आणि पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे व्यासपीठावर होते. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाला ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, स्वरानंद प्रतिष्ठानचे प्रकाश भोंडे, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, जयंत जोशी, गायक श्रीकांत पारगावकर, गायिका अनुराधा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
कुवळेकर पुढे म्हणाले, शब्दांविषयीचे विलक्षण प्रेम हे काकतकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, हे शब्दप्रेम वरवरचे नाही. ते अभ्यासातून, व्यासंगातून आले आहे. शब्दांशी खेळण्याचा त्यांना छंद आहे. त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभली. या संधींचा उपयोग त्यांनी अभ्यास, निरीक्षण अधिक सूक्ष्म करण्यासाठी केला. त्यांचे लेखन या निरीक्षणांतून, अभ्यासातून, सहवासातून आले आहे. त्यामागील लेखकाची दृष्टी महत्त्वाची आहे.
सर्वार्थाने सुंदर पुस्तके असल्याचे सांगून मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, मी स्वतःला पडद्यावर प्रथम पाहिले ते काकतकर यांच्यामुळे. दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांतून आमच्या पिढीवर उत्कृष्ट संस्कार काकतकरांसारख्या निर्माता–दिग्दर्शकांनी केले आहेत.
सुरेश खरे म्हणाले, काकतकर हे अतिशय भाग्यवान निर्माते ठरले. सूक्ष्म निरीक्षण, थक्क करणारे शब्दसामर्थ्य, प्रवाही लेखनशैली हे त्यांचे विशेष दिसतात. त्यांच्या लेखनातून नवे, वेगळे शब्द परिचित होतात. सरकारी नोकरीत दीर्घकाळ असूनही त्यांच्यातील संवेदनशीलता अबाधित राहिली, हेही महत्त्वाचे आहे.
अरुण काकतकर म्हणाले, मला लेखनाची पहिली संधी मनोहर मासिकात मिळाली. सर्वच पहिल्या गोष्टींचे महत्त्व असते. त्यामुळे मला संधी देणाऱ्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. योग्यता असूनही संधीविना जे मागे राहिले त्यांच्याविषयी माझ्या मनात संवेदनाही आहेत.
निलिमा जोशी-वाडेकर यांनी प्रकाशकीय प्रास्ताविक केले. राधिका काकतकर यांनी आभार मानले. ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : उत्कर्ष प्रकाशन आयोजित कार्यक्रमात (डावीकडून) नीलिमा जोशी-वाडेकर, मृणाल कुलकर्णी, सुरेश खरे, विजय कुवळेकर, अरुण काकतकर, किरण पुरंदरे आणि सु. वा. जोशी.
प्रति,
मा. संपादक
उत्कर्ष प्रकाशन आयोजित कार्यक्रमाच्या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
सु. वा. जोशी
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button