January 20, 2026

स्वरांच्या पालखीत सजली संत रचनांची मांदियाळीरसिकांनी अनुभवला भक्तीरसाचा स्वरविलास

0
IMG-20250706-WA0035
Spread the love

शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, हेमंत पेंडसे, सावनी शेंडे-साठ्ये राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांचे भक्तीभावपूर्ण सादरीकरण
पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत मीराबाई, संत सोयराबाई, संत चोखामेळा, समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या भक्तीरचनांचे भावपूर्ण सादरीकरण ‌‘स्वरविलास‌’ या कार्यक्रमात रसिकांनी अनुभवले.
आषाढी एकादशीनिमित्त मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या आवरातील सभागृहात रविवारी (दि. 6) संगीत प्रेमी विलास जावडेकर यांच्या ‌‘स्वरविलास : लय विठ्ठल, सूर विठ्ठल‌’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि रसिकाग्रणी विलास जावडेकर यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातील अनेक भक्तीरचनांचे संगीतही पंडित पेंडसे यांचेच होते. या कार्यक्रमात पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे-साठ्ये, पंडित हेमंत पेंडसे यांच्यासह राधिका ताम्हनकर, प्रज्ञा देशपांडे यांनी संतरचना सादर केल्या.
सुरुवातीस सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, शुभदा मोघे, संध्या पटवर्धन, कल्पना जावडेकर, मधुरा पेंडसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस ‌‘जय जय रामकृष्ण हरी‌’चा सामुहिक गजर करण्यात आला. ‌‘मन रे परसी हरी के चरण‌’ या भक्तीरचनेने विदुषी सावनी शेंडे-साठ्ये यांनी कार्यक्रमाचा आरंभ केला.
.‌‘आधी रचिली पंढरी‌’, ‌‘राम बरवा‌’, ‌‘टाळ दिंडीचा गजर‌’, ‌‘राम गावा राम घ्यावा‌’, ‌‘संत भार पंढरीत‌’, ‌‘मै गोविंद गुण गाणा‌’, ‌‘बादल देख डरी‌’, ‌‘अवघे गर्जे पंढरपूर‌’, ‌‘अबिर गुलाल‌’, ‌‘येरे येरे माझ्या रामा‌’, ‌‘बोलावा विठ्ठल‌’ या संत रचना सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता पंडित शौनक अभिषेकी, पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या ‌‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर‌’ या सुप्रसिद्ध रचनेने केली.

पंडित हेमंत पेंडसे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‌‘मौनाच्या संध्याकाळी‌’, ‌‘बादल देख डरी‌’, ‌‘येरे येरे माझ्या रामा‌’ आणि ‌‘मन रे परसी हरी के चरण‌’ चार भक्तीरचनांचे या प्रसंगी रसिकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे माहितीपूर्ण निवेदन स्नेहल दामले यांचे होते.
राहुल गोळे (ऑर्गन), प्रणव गुरव (तबला), मनोज भांडवलकर (पखवाज), तुषार दीक्षित (की-बोर्ड), अवधुत पायगुडे (तालवाद्य) यांनी समर्पक साथसंगत केली.

सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आठवणींना उजाळा देताना पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, माझे वडिल बहुश्रुत व बहुआयामी होते. त्यांच्यातील संगीत रचनेचा पैलू पंडित हेमंत पेंडसे यांनी आत्मसात केला आहे. यातूनच पंडित पेंडसे यांच्या हातून उत्तमोत्तम संगीत रचना होत आहेत आणि त्या रचनांवर गुरूंची कृपासावली असलेली जाणवते.

प्रास्ताविकात अनिल पटवर्धन यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली. कलाकारांचा सत्कार विलास जावडेकर, कल्पना जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

फोटो ओळ : ‌‘स्वरविलास‌’ कार्यक्रमात भक्तीरचना सादर करताना पंडित रघुनंदन पणशीकर, पंडित शौनक अभिषेकी, पंडित हेमंत पेंडसे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button