July 1, 2025

ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाहीज्येष्ठ पंचागकर्ते मोहन दाते ; ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा चतुर्थ पदवी प्रदान सोहळा व शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे वितरण

0
IMG-20250630-WA0053
Spread the love


पुणे : विज्ञानावर आधारित अभ्यास आणि संशोधन ही केवळ ज्योतिष शास्त्राचीच नव्हे तर काळाची गरज आहे. विज्ञान हे ज्योतिषशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला वाव नाही, असे मत ज्येष्ठ पंचांग कर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले.

ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन पद्मावती येथील विणकर सभागृहात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ शुभांगिनी पांगारकर, संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी उपस्थित होते. विद्यावाचस्पती ज्येष्ठ गाणपत्य डॉ. स्वानंद पुंड महाराज यांना शारदा पुरस्कार, अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते यांना रत्नमाला पुरस्कार, योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेचे अध्यक्ष अश्वमेघयाजी चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वास्तु विशारद, लोलक विशारद, अंक विशारद आणि वास्तु भूषण अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्यात १२० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. पुरोहितांचे मंगल मंत्र पठण, सान्वी फुंडकर यांचे सुसंस्कृत नृत्य आणि सन्मान समारंभ पार पडला.

मोहन दाते म्हणाले, ज्योतिष शास्त्रामध्ये अधिक अभ्यास आणि संशोधन केले पाहिजे. संस्कृती जपण्यासाठी विज्ञानावर आधारित ज्योतिष शास्त्र पुढील पिढीपर्यंत जाणे गरजेचे आहे समाजामध्ये काळाप्रमाणे बदल घडत आहेत. पूर्वी बहपत्नीत्व संकल्पना होती, परंतु आता ती दूर झाली आहे. त्यानुसारच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झाला पाहिजे.

स्वानंद पुंड म्हणाले, माणसाला जगण्यासाठी बुद्धी आणि सिद्धी दोन्ही ची गरज असते. केवळ विद्वत्ता किंवा पुस्तकी ज्ञान असणे गरजेचे नाही, तर त्याला व्यवहार ज्ञानाचीही जोड असावी लागते. अध्यात्माच्या माध्यमातून स्वानंदाची प्राप्ती होते, असेही त्यांनी सांगितले.

वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले म्हणाले, ज्योतिषाचे मूळ वेद आहे. काळानुसार आपल्या पूर्वजांनी यज्ञाचे अनुसरण केले आहे. वेदांमध्ये सर्व शास्त्राची उत्पत्ती झाली आहे. जे सहा शास्त्र विज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत, त्यापैकी एक ज्योतिष शास्त्र आहे. चैतन्य नारायण काळे गुरुजी म्हणाले, योगामध्ये विज्ञानाचा समावेश आहे. त्यामुळे योग विद्येकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. विज्ञानावर आधारित योग आणि वेद तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. वेदांवर आधारित हजारो ज्योतिष विषयक ग्रंथांची निर्मिती झाली आहे, हे ग्रंथही तरुणांना मिळणे आवश्यक आहे.

वेदमूर्ती उमेश कुलकर्णी म्हणाले, विज्ञानावर आधारित ज्योतिष वास्तुविद्येचे अध्ययन केलेले लाखो वास्तु ज्योतिष विशारद तयार करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या विद्यार्थ्यांना स्वत:चे व्यासपीठ मिळावे, त्यांना इतरांकडे व्यासपीठ मिळवण्यासाठी याचना करायला लागू नये, यासाठीच पुरस्कार आणि अशा प्रकारच्या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला आणि व्यासपीठाला तरुणांचा दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.देश विदेशातील जवळपास १७५ विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

दुपारी विशेष सत्रात विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच प्रॅक्टिकल वास्तू व्हिजीट आयोजित करण्यात आली होती. वास्तु व्हिजिटच्या वेळी गुरुजींनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञा करून घेतली की आलेल्या जातकाची कोणत्याही परिस्थितीत फसवणूक करायची नाही. ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र हे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तूशास्त्र, अंकशास्त्र व ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देत आहे. आजवर या संस्थेतून ३,००० पेक्षा अधिक विद्यार्थी यशस्वीरीत्या प्रशिक्षित होऊन समाजसेवेच्या माध्यमातून स्वत:चे यशस्वी करियर घडवत आहेत.

  • फोटो ओळ : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन पद्मावती येथील विणकर सभागृहात करण्यात आले. यावेळी उपस्थित पुरस्कारार्थी व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button