January 19, 2026

मंजुषा पाटील यांच्या गायनातून स्वरांची मोहिनीबालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त रंगली नाट्यपदांची मैफल

0
IMG-20250628-WA0021
Spread the love

पुणे : तारसप्तकात सहज फिरत असलेला खडा आवाज, त्याच बरोबर नजाकत दर्शविणारा लडिवाळपणा आणि अभिनयाच्या अंगाने भावप्रदर्शित करून विदुषी मंजुषा पाटील यांनी सादर केलेल्या नाट्यपदांनी रसिक मोहित झाले.
संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे नटसम्राट बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी गायलेल्या अजरामर नाट्यसंगीतावर आधारित ‌‘मम सुखाची ठेव‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर सभागृहात करण्यात आले होते. विदुषी मंजुषा पाटील यांनी दहा वर्षांनंतर पुण्यात नाट्यसंगीताच्या रंगविलेल्या मैफलीला पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात ‌‘नमन नटवरा विस्मयकारा‌’ या नांदीने झाली. त्यानंतर स्वयंवर, मानापमान, सौभद्र, अमृतसिद्धी, कान्होपात्रा, एकच प्याला, विद्याहरण अशा विविध संगीत नाटकांमधील गाजलेली नाट्यपदे विदुषी मंजुषा पाटील यांनी प्रभावीपणे सादर केली.
‌‘मधु मधुरा तव‌’, ‌‘बलसागर तुम्ही वीर शिरोमणी‌’, ‌‘मम सुखाची ठेव देवा‌’, ‌‘धावत येई सख्या यदुराया‌’ या पदांसह ‌‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी‌’, ‌‘जोहार माय बाप जोहार‌’ या नाट्यपदांचे सुरेल सादरीकरण करताना अनेक नाट्यगीतांना रसिकांकडून वन्समोअर अशी दाद मिळाली. कार्यक्रमाची सांगता कान्होपात्रा नाटकातील ‌‘अगा वैकुंठीच्या राया‌’ या भैरवीतील सुप्रसिद्ध अभंगाने केली. विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वरांच्या जादूने मोहित करून विठोबाचे लोभसवाणे रूप रसिकांसमोर साकार केले. विठ्ठल नामाच्या जयघोषात, टाळ्यांच्या गजरात सारे रसिक दंग झाले.
बालगंधर्व यांच्या सांगीतिक प्रवासासह अनेक वैयक्तिक किस्से सांगत रवींद्र खरे यांनी अभ्यासपूर्ण निवेदनातून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
प्रशांत पांडव (तबला), राहुल गोळे (ऑर्गन), प्रसाद जोशी (पखवाज), अपूर्व द्रविड (तालवाद्य), श्रुती भावे-चितळे (व्हायोलिन), तनिष्क अरोरा, अनुष्का साने, रसिका पैठणकर (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली.
कलाकारांचा सत्कार वीणा सहस्त्रबुद्धे, संजय चितळे, गिरीश चितळे, जयंत सप्रे, गोविंदराव बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला सांगीतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.
नटसम्राट बालगंधर्व यांच्यासह संगीत नाटकात भूमिका केलेल्या ज्येष्ठ गायक-अभिनेत्री विदुषी निर्मला गोगटे यांनी पंडित काणेबुवा, भास्करबुवा बखले, बालगंधर्व आणि कवी कुलगुरू कालिदास यांच्या कार्याची महती विशद केली. बालगंधर्व हे फक्त सुरेल, नादमय अभिनेते गायक नव्हते तर त्यांचे गाणे हृदयातून फुललेले असे. रंगमंचावरील पदन्यास, केशभूषा, वेशभूषा याकडे बालगंधर्व यांचा विशेष कटाक्ष असे. मंजुषा पाटील यांच्या गायनात नाट्यसंगीताला आवश्यक बहारदारपणा तसेच लडिवाळपणाही आहे अशा शब्दात गोगटे यांनी मंजुषा पाटील यांच्या गायकीचे कौतुक केले.
फोटो : ‌‘मम सुखाची ठेव‌’ मैफलीत नाट्यगीते सादर करताना मंजुषा पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button