February 16, 2026

भरतनाट्यम्‌ नृत्यकलेतून साकारलेल्या गीतरामायणाने रसिक मंत्रमुग्ध…स्वरांगण आणि कलांगण अकादमीतर्फे आयोजन…गीतरामायण केवळ काव्य नव्हे तर चळवळ : आनंद माडगुळकर

0
IMG-20250624-WA0050
Spread the love

पुणे : गीत-संगीतासह भरतनाट्यम्‌ नृत्याद्वारे साकारलेले रामायणातील विविध रोमांचक प्रसंग रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले.
निमित्त होते स्वरांगण आणि कलांगण अकादमीतर्फे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने आयोजित आणि नृत्यमनाट्यम आणि त्रिवेणी संगीत विद्यालय, सातारा प्रस्तुत ‘गीत रामायण’ या सुमधुर, सांगीतिक व नृत्यमय प्रस्तुतीचे! टिळक स्मारक मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुस्वर, भावपूर्ण गायन-वादन, नृत्याविष्कार आणि अभ्यासपूर्ण निवेदनाच्या माध्यमातून, भाषाप्रभू ग. दि. माडगूळकर रचित आणि स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले ‘गीतरामायण’ या लोकप्रिय रामकथेच्या दीव्य पद्द्यांचे सादरीकरण करण्यात आले. ग. दि. माडगुळकर यांचे सुपुत्र आनंद माडगुळकर तसेच डॉ. अतुल जोशी, प्रसिद्ध सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, यशवंतराव कुलकर्णी, उदय कुलकर्णी आणि संजय गोसावी यांची विशेष उपस्थित होती.
दशरथ राजाचा परिवार, श्रीराम आणि त्यांच्या बांधवांचा जन्मसोहळा, सीतास्वयंवर, श्रीरामांचे वनवासगमन, सीताहरण, सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीरामांनी वानरसेनेसह केलेले अथक प्रयत्न, रामसेतूची उभारणी, राम-रावण युद्ध आणि अखेर रावण वध अशा रामायणातील अनेक प्रसंग कलाकारांनी अवघ्या अडीच तासात सादर करून रसिकांसमोर संपूर्ण रामकथा चितारली. यावेळी ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’, ‘दशरथा हे घे पायसदान’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘नकोस नौके परत फिरू’, ‘पराधीन आहे जगती’ यांसारख्या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचेच भान हरपून गेले. शब्द, स्वर आणि नृत्याविष्कार यांचा अनोखा त्रिवेणीसंगम रसिकांनी या कार्यक्रमातून अनुभवला.
कार्यक्रमात एकूण १८ युवा कलाकारांचा सहभाग होता. १० कलाकारांनी नाट्य आणि नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन तेजस माने यांनी केले होते. चंद्रकांत शिंदे, संतोष वाघ, मिताली लोहार यांनी सुरेल आवाजात गीते सादर केली. राजेंद्र आफळे यांनी सुमधुर वाणीत सूत्रसंचालन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुधीर पाध्ये, चैतन्य पटवर्धन (तबला), अथर्व इंगवले (तालवाद्य) तर स्वरा किरपेकर (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. संगीत संयोजन स्वरा किरपेकर यांचे होते.
गीतरामायण हे केवळ काव्य नाही तर ती चळवळ आहे. ही अजरामर कलाकृती असल्यामुळे कवी, निवेदक, संगीतकार यांना आजही गीतरामायणावर आधारित कलाकृती सादर करण्याचा मोह होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. येत्या काळात विविध नृत्यशैलींमध्ये गीतरामायणावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली. गीतरामायण हा एकप्रकारचा सागर आहे. त्यात आपण जितके खोल जाऊ तितकी अनमोल रत्ने आपल्याला सापडत जातील, असेही ते म्हणाले.
रसिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन उदय कुलकर्णी, संजय गोसावी, हृषीकेश सबनीस, रमा सबनीस, अश्विन आपटे, रवी नल्ले यांनी केले होते.
फोटो : नृत्यविष्कारातून गीत रामायण विविध प्रसंग साकारताना कलाकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी