July 1, 2025

धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठीकेंद्र सरकारने कायदा करावा: डॉ. कल्याण गंगवाल

0
IMG-20250605-WA0032
Spread the love

  • बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मागणी

पुणे: “सर्व धर्मात प्राणी व पशुहत्या निषेधार्ह मानली आहे. कोणत्याही धर्माने हत्येचे वा हिंसेचे समर्थन केलेले नाही. उघड्यावर दिला जाणारा बकऱ्याचा बळी, त्यामुळे होणारे प्रदूषण, त्यातून पसरणारी रोगराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली होणारी पशुहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा करावा व त्याची कडक अंमलबजावणी करावी,” अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केली. बकरी ईदच्या (दि. ७) पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कल्याण गंगवाल बोलत होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “बकरी ईद अहिंसक व पर्यावरणपूरक व्हावी. अल्लाहने माणसाची सर्वात प्रिय गोष्ट भेट देण्याचा आदेश दिला होता. अंहकार हा माणसाला प्रिय असून, त्या अहंकाराचा त्याग करावा, त्याचा बळी दिला जावा, अशी अल्लाहची अपेक्षा होती. कुराणनुसारही मांस, रक्त व हत्येचा निषेध केला आहे. त्यामुळे बकरी ईदच्या नावाखाली प्राण्यांचा बळी देऊ नये. प्रतीकात्मक बकरी ईद साजरी करावी. त्यासाठी पिठाची प्रतीकात्मक बकरी, किंवा बकरीच्या प्रतिमेचा उपयोग करून ही ईद साजरी करावी. मुस्लिम बांधवानी यंदाच्या बकरी ईदला पशुबळी देण्यापासून दूर राहावे. कोणत्याही प्राण्याचा जीव घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.”

“उघड्यावर बळी देणे कायद्याने गुन्हा आहे. त्या कायद्याचे पालन व्हावे. मोरोक्कोसारख्या मुस्लिमबहुल देशातही पर्यावरणाचा विध्वंस थांवण्यासाठी बकरी कापण्यावर कायद्याने बंदी आहे. तिथल्या सरकारने तास फतवा काढलेला आहे. प्राण्याचा बळी न देता गोरगरिबांना भेटवस्तू देण्याचे त्यात नमूद केलेले आहे. एखादा मुस्लिम देश असा निर्णय घेऊ शकतो, तर आपण का घेत नाही, असा सवाल आहे. प्राण्यांचा बळी दिल्यानंतर त्यातून रक्त, मांस यामुळे रोगराई पसरते. पाणी व हवेचे प्रदूषण होते. घातक वायू तयार होतो. कोरोनाचा शिरकाव पुन्हा होत आहे. त्यामुळे प्राणी कापण्यावर बंदी घातली पाहिजे,” असे डॉ. गंगवाल म्हणाले.

डॉ. कल्याण गंगवाल पुढे म्हणाले, “संपूर्ण जगामध्ये गेल्या वर्षी आकडेवारीप्रमाणे १८ कोटी प्राण्यांचे बळी दिले गेले असून, त्यात भारतातील पशुहत्येची संख्या २ कोटी आहे. हे सगळे पर्यावरणाला अत्यंत घातक आहे. प्राणी कापला, तर त्याच्या शरीरातून असंख्य वेदना तरंग बाहेर पडतात. त्याला आईन्स्टाईन पेन व्हेव म्हणतात. याची शक्ती प्रचंड आहे. त्यामुळे भूकंप, त्सुनामी यासारखे संकट निर्माण होऊ शकते. रेड्यांच्या बळीमुळे नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के बसतात, असे संशोधनातून पुढे आले आहे.”

पशुहत्या सर्व धर्मात वर्ज्य असून, हिंदू धर्मातही पशुहत्येला स्थान नाही. धर्माच्या नावाखाली देवीदेवतांसमोर कोणताही पशुबळी देऊ नयेत. या विरोधात केंद्र सरकारने कायदा करावा. आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे प्रतिबंध करणारा कायदा आहे. या राज्यात कायदा होत असेल, तर देशात का होऊ शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून कठोर कायदा आणावा. भगवान महावीरांनी दिलेली ‘अहिंसा परमो धर्म:’ ही शिकवण, ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी वेळीच योग्य पावले उचलण्याची गरज आहे, असेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button