July 4, 2025

द्वेषाचे राजकारण टाळून आपलेपणाने माणूस जोडायला हवा

0
IMG-20250602-WA0054
Spread the love

  • प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; बंधुता दिनानिमित्त सातव्या विश्वबंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन

पुणे: “पहलगाम घटनेच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकरण करण्याचा प्रयत्न काहींनी केला. मात्र, सामान्य माणूस आणि काश्मिरी जनतेने त्यांचा हा डाव हणून पाडला. आरक्षण, आर्थिक विषमता, जातीवाद यातून समाजात फूट पाडण्याचे काम होत असताना बंधुतेच्या भावनेतून आपलेपणाने माणूस जोडायला हवा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. सुभाष वारे यांनी केले. समाजामध्ये बंधुता व समतेचा विचार पेरण्याचे काम बंधुता परिवाराकडून होत असल्याचे गौरवोद्गारही प्रा. वारे यांनी काढले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनाच्या निमित्ताने आयोजित सातव्या बंधुता काव्यमहोत्सवाचे उद्घाटन सोहळ्यात प्रा. सुभाष वारे बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात काव्यमहोत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार सिराज शिकलगार, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, स्वागताध्यक्ष प्रा. भारती जाधव, निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, कवयित्री संगीता झिंजुरके आदी उपस्थित होते.

यावेळी सिराज शिकलगार लिखित ‘गझल प्रकाश’ गझलसंग्रहाचे, ‘भारत: विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र’ साहित्यकृतीचे प्रकाशन झाले. अरुण पुराणिक (पुणे), प्रभाकर शेळके (जालना), राजू आठवले (अकोला), पालवी पतंगे (मुंबई), तुकाराम कांबळे (नांदेड) सरला कापसे (वर्धा), राजश्री मराठे (हैद्राबाद), राजेश नागूलवार (वर्धा), मनीषा गोरे (सोलापूर), हृदयमानव अशोक (पुणे), प्रतिभा विभुते (पुणे) यांना बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रा. सुभाष वारे म्हणाले, “चळवळीत ‘विचार पेरा कृती उगवेल’ हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. सकारात्मक, शाश्वत काम व्हायचे असेल, तर ध्येयासक्त होऊन सदोदित प्रयत्नशील रहायला हवे. बाबासाहेबांनी बंधुता व समता या दोन मूल्यांची कमतरता असल्याची खंत संविधान सभेत व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या विचारांना पुढे घेऊन जात बंधुता परिवार माणसाला माणूस जोडत आहे. समता ही समाजाच्या भल्यासाठी हवी. आज मुस्लिमांना व्हिलन ठरवण्याचे काम होतेय. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही खरे गुन्हेगार मोकाट आहेत. समाज घडायचा असेल, तर पुस्तक वाचायला हवीत. मुस्लिम धर्मातही चांगला माणूस घडण्यासाठी काही सुधारणा, प्रबोधन आवश्यक आहे.”

अध्यक्षीय भाषणात सिराज शिकलगार म्हणाले, “कवी हा कवितेच्या माध्यमातून समाजातील व्यथा मांडत असतो. शब्दांमध्ये समाजात बदल करण्याची ताकद असते. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी भाषेतील साहित्य हे समकालीन कालखंडात लिहले गेलेले असते. त्यामुळे त्यावर सद्यपरिस्थितीनुसार आकलन करणे योग्य नाही. प्रमाण भाषेचा वापर करून लिखान व्हायला हवे. परंतु भाषेची मोडतोड, मराठी भाषेचे विद्रुपीकरण होऊ नये. परभाषेच्या नादात उचलेगिरी केली जाते. त्यामुळे लिखाणात चुकीच्या शब्दांचा वापर होऊन मराठी भाषेचा ऱ्हास होण्याची भीती असते.

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुता चळवळीत प्रेमाचे अंतःकरण असलेल्या अनेकांची साथ मिळाली. गेल्या पन्नास वर्षात माणुसकी जपण्याचे काम करता आल्याचे समाधान आहे. समृद्ध, प्रामाणिक माणूस म्हणून प्रत्येकाने बंधुतेचा विचार पेरला पाहिजे. आज युद्धजन्य परिस्थितीत बुद्धाच्या, बंधुतेच्या विचारांची समाजाला गरज आहे.”

प्रा. भारती जाधव यांनी स्वागत केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button