July 4, 2025

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्येबुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

0
IMG-20250512-WA0158
Spread the love

  • नाट्य, कवितांतून विद्यार्थ्यांनी अनुभवली बुद्धांची शिकवण

पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा साजरी केली. बुद्धांच्या शिकवणीतून विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ञा, नैतिकता, चारित्र्य आणि एकाग्रतेचा विकास करण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम घेण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

सायली हरिदास यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. बारावी कॉमर्समधील विद्यार्थी दक्ष काहत याने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे महत्व, तसेच बुद्धांच्या विचारांची आजच्या काळात कशी गरज आहे, हे आपल्या मनोगतातून सांगितले. राजपुत्र ते संत असा भगवान बुद्धांचा जीवनप्रवास बारावीतील विद्यार्थिनी सान्वी मट्टीगट्टी हिने उलगडली. वेदिका बंड हिने हृदयस्पर्शी कविता सादर करीत युद्धांमुळे होणाऱ्या परिणामांवर आणि आज जगात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य केले.

भगवान गौतम बुद्ध यांचा जीवनप्रवास उलगडणारी छोटी नाटिका यावेळी सादर झाली. ‘अंगुलीमालाची गोष्ट’ यामधून क्रूर मारेकरी ते बुद्धांचे पाईक झाल्याची कहाणी विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने मांडली. मयुरेश भोंगे या विद्यार्थ्याने बुद्धांची भूमिका साकारली. सुदाम पोटे याने अंगुलीमाल, तर वैष्णवी टीपेवार हिने अंगुलीमालच्या आईची भूमिका साकारली. दुसरी नाटिका आजच्या काळात बुद्धांच्या विचारांची गरज यावर होती. राहुल या महाविद्यालयीन तरुणाभोवती ही कथा फिरते. तो मोबाईलच्या आहारी गेलेल्या असतो. त्यातून तो आपली आई आणि शिक्षकांवर हल्ला करतो. बुद्धांच्या अष्टांग मार्गाच्या शिकवणीमुळे त्याला आपल्या चुका लक्षात येतात आणि करुणा व अहिंसेच्या मार्गावर चालण्याची तो प्रतिज्ञा घेतो. मयुरेश भोंगे (बुद्ध), श्लोक मोहोळ (राहुल), दक्ष काहत (शिक्षक), गार्गी झारे (राहुलची आई), प्रणय कुंभार (राहुलचा मित्र) यांनी यामध्ये भूमिका साकारल्या आहेत. सान्वी मट्टीगट्टी हिने याचे सादरीकरण केले. पटकथा लेखन, संगीत निवड आणि संयोजन अंकिता जाधव, सायली हरदास व पिंकी करमरकर यांनी केले. वंदना पांड्ये आणि सिद्धी खळे यांनी पात्र निवड व वेशभूषेचे संयोजन केले.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे महासंचालक व मुख्य विकास अधिकारी डॉ. रामचंद्रन यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना सनातन धर्माविषयी माहिती दिली. भारतात हिंदुत्वाचा प्रसार करण्यासह विविध ठिकाणी मठांची स्थापना करण्यात आदी शंकराचार्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला. पिंकी करमरकर यांनी आभार मानले. फलक आणि वर्गखोल्यांची सजावट दक्ष काहत, करुणा प्रजापती, महेश चौधरी, यश्वी पंड्या, साजिरी रंदेवाडी, सानिया सेन, गौरी देशपांडे, ओजल कोनाली, अंजली कांगेट्टी यांनी केली.

द्वेषाला द्वेषाने नव्हे, तर प्रेमाने जिंकता येते, हा बुद्धांचा विचार कायम लक्षात ठेवायला हवा. मन स्वच्छ ठेवून प्रेमभावाने सर्वांशी वागायला हवे. क्रोध हा क्षणिक, तर करुणा शाश्वत आहे. त्यामुळे करुणेचे, अहिंसेचे पालन करावे. चांगल्या-वाईटाची पारख करण्यासाठी शांत चित्ताने विचार करायला हवा. परिवर्तन हा जीवनाचा नियम असून, तो आत्मसात करण्यात शहाणपन आहे. नवी कौशल्ये, नवे तंत्रज्ञान आत्मसात करतानाच मूल्ये आणि संस्कारांचा विसर पडू देऊ नये. बुद्धांच्या विचारांचा खरोखर अंमल झाला, तर जगात शांतता नांदेल.

  • प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button