July 4, 2025

राजेंद्र पवार कर्तव्यनिष्ठ बहुआयामी व्यक्तीमत्व : डॉ. श्रीपाल सबनीसअतुलनीय योगदानाबद्दल आडकर फौंडेशनतर्फे राजेंद्र पवार यांचा गौरव

0
IMG-20250511-WA0144
Spread the love

पुणे : आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार लाभलेल्या राजेंद्र पवार यांचा प्रवास शून्यातून सुरू झाला. मातीशी आणि माणसांशी बांधिलकी जपत त्यांनी स्वत:च्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांशी जुळवून घेणारे असे हे कर्तव्यनिष्ठ बहुआयामी व्यक्तीमत्व आहे, अशा शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव केला.

पुणे येथे महावितरणचे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना राजेंद्र पवार यांनी अतुलनीय योगदान देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांची पदोन्नतीवर महावितरणच्या मुख्य कार्यालयात संचालकपदी (मानवसंसाधन विभाग) नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे आज (दि. 11) त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा सत्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.

पवार यांनी माणसातील माणूसपण जपत सर्वांशी अनुबंध निर्माण केले आहेत, यातूनच त्यांचे कार्यकर्तृत्व बहरास आले आहे, असे गौरवोद्गारही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले, माझे अस्तित्व महावितरणमुळेच आहे. ज्या क्षेत्रात आपण मोठे होतो त्या क्षेत्राला कधीही विसरू नये. महावितरणविषयी लोकांच्या मनात असलेली वाईट प्रतिमा बदलण्याचा मी कसोशिने प्रयत्न केला आहे. यात अधिकारी-कर्मचारी वर्गाचेही सहकार्य लाभले आहे. ग्राहकांपासून लांब न राहता काही तरी वेगळे करण्याच्या जिद्दिने मी कार्यरत राहिलो आहे. कार्यात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करत, सहकाऱ्यांचे गुण हेरून सांघिक भावनेतून कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मिळालेले पुरस्कार माझे वैयक्तिक नसून माझ्यासह सर्व सहकाऱ्यांचे आहेत.

सचिन ईटकर म्हणाले, राजेंद्र पवार यांनी आपल्या कामातून एक स्वतंत्र पायंडा निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन खात्याचा लौकिक वाढविण्याचे कार्य व्हावे.

सामाजिक कार्यात राजेंद्र पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनोहर कोलते यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी तर सन्मानपत्राचे वाचन डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार यांनी केले.

फोटो : आडकर फौंडेशन आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) सचिन ईटकर, ॲड. प्रमोद आडकर, राजेंद्र पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, मनोहर कोलते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button