July 4, 2025

नाकर्ते सरकार, बेजबाबदार शहरी नागरिकांमुळे पाणीसमस्या

0
IMG-20250505-WA0016
Spread the love


पुणे-मुंबई शहरात पाण्याचा अतिवापर : लक्ष्मीकांत देशमुख
लक्ष्मीकांत देशमुख यांची टीका : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जलदूत देवांग जानी यांचा गौरव
पुणे : पाण्याविषयी सरकारचा नाकर्तेपणा आणि शहरांमधील बेजबाबदार नागरिकांमुळे पाणीसमस्या उद्भवली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू राहिल्यास खेड्या-पाड्यांमधील भेडसावणारा भीषण पाणीप्रश्न भविष्यात शहरांमध्ये निर्माण होऊ शकतो, असा इशारा ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला. पाणी टंचाईची भीषण परिस्थिती समजून न घेता पुणे-मुंबईसारख्या शहरातील नागरिक अमाप आणि अयोग्य पद्धतीने पाणी वापर करीत असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केली.
पाणीविषयक मोलाचे कार्य करणारे नाशिक येथील गोदाप्रेमी समितीचे अध्यक्ष, जलदूत देवांग जानी यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे आज (दि. 5) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या संचालिका प्रज्ञा महाजन मंचावर होते. शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रम झाला.
देशमुख पुढे म्हणाले, मानवाने प्रत्येक नदीशी खेळ केला आहे. नदी कोरडी होणे म्हणजे जणू स्त्री अब्रू घेणे आहे. जसजशी शहरे श्रीमंत होत गेली तसतशा नद्या कोरड्या पडत गेल्या. हे समजून घेताना नदीने आत्महत्या केली की, दुराग्रही माणसाने त्यांचा खून केला याचा विचार होणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज व तहान वाढली आहे. परंतु पिण्याचे पाणी हे अक्षय नाही. पाणी वापराबरोबरच त्याचे पुनर्भरण होते की नाही याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. पाणी मुबलक आहे म्हणून उधळू नका. विहिरी, तलाव, हौद, उपनद्या पुनर्जिवित करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुणेकर हट्टी
पुणे शहरात मुबलक पाणी उपलब्धी आहे म्हणून त्याचा अविवेकी वापर केला जात आहे. याविषयी जागृती करूनही पुणेकर पाण्याचा निष्काळजीपूर्वक वापर करीत आहेत. आम्ही पैसे देतो त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे तेवढे पाणी मिळावे अशी पुणेकरांची दुराग्रही आणि हट्टी भूमिका आहे, अशी टीका लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.

नद्यांमध्ये मानवी हस्तक्षेप वर्जित : देवांग जानी
आपल्या कार्याची माहिती देताना देवांग जानी म्हणाले, नाशिक महापालिकेने गोदावरी पात्रातील 17 प्राचीन कुंडे बुजविल्याने नदीतील जीवंत पाण्याचे स्रोत नष्ट झाले होते. त्याविरुद्ध शासनाशी लढा देत नदीपात्रातील पाच कुंडातील सुमारे पाच लाख किलो सिमेंट काढण्यात यश आले. त्यातून स्रोत जीवंत झाले. गोदावरी नदी ही नाशिक शहराचे हृदय आहे तर उपनद्या म्हणजे वाहिन्या आहेत. उपनद्या जीवंत राहिल्यास मुख्य नदी जीवित राहते, या करिता पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उपनद्या जीवंत ठेवण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीनुसार नद्यांना आईचा दर्जा दिला जातो, त्यामुळे नद्या प्रदुषित करणे म्हणजे आईचा आपमान करण्यासारखे आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. निसर्गाकडून आपण फक्त ओरबाडून घेत आहोत त्याला परत काहीच देत नाही ही मानवाची मोठी चूक आहे. नद्या निसर्गनिर्मित आहेत, त्यांच्यात मानवी हस्तक्षेप वर्जित आहे.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात देवांग जानी यांच्या कार्याची माहिती दिली. ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचे काम समाजापुढे आणावे, ज्या योगे सकारात्मकता निर्माण होईल, यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
भविष्यात कुणालाही पाणी फुकट मिळणार नाही. तर पाण्यासाठी पैसा मोजावा लागेल, असे प्रज्ञा महाजन म्हणाल्या. मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे पाणी या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
फोटो ओळ : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, देवांग जानी, लक्ष्मीकांत देशमुख, प्रज्ञा महाजन.
प्रति,
मा. संपादक
पाणीविषयक मोलाचे कार्य करणारे नाशिक येथील जलदूत, देवांग जानी यांचा आज (दि. 5) रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगत-संगत प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button