पुलवामा आतंकवादी हल्ल्यातील शौर्यचक्र विजेते

असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’
देशासाठी, सहकाऱ्यांसाठी आत्मविश्वासाने लढत राहिलो
– झिले सिंह यांची भावना; पुलवामा हल्ल्यातील शौर्याबद्दल ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ प्रदान
झिले सिंह यांचा पुलवामा हल्ल्यातील पराक्रम सर्वांसाठी प्रेरक
- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची भावना; झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ प्रदान
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आतंकवादी हल्ल्यावेळी आपल्या प्राणांची बाजी लावत, शौर्याने लढून विजयश्री खेचून आणणारे केंद्रीय राखीव सुरक्षा दलातील (सीआरपीएफ) असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांच्या पत्नी सुनीता झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते झिले सिंह व त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सिद्धांत चोरडिया यांच्यासह सूर्यदत्त संस्थेच्या विविध महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झिले सिंह यांच्या हस्ते सूर्यदत्त ग्लोबल आर्मीचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “झिले सिंह यांनी केलेला पराक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समोर मृत्यू दिसत असताना, सहकारी शहीद होत असताना निडरपणे शत्रूशी दोन हात करत त्यांनी दाखवलेले शौर्य प्रखर देशभक्तीचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये देशभक्ती, राष्ट्राचे संरक्षण आणि निष्ठेची भावना जागृत राहावी, यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे आहेत.”
झिले सिंह म्हणाले, “महिलांचा सन्मान केवळ एक दिवस नव्हे, तर रोज व्हायला हवा. त्यांचा प्रत्येक गोष्टीत आपण आदर केला पाहिजे. पुलवामाची लढाई माझ्यासाठी दुसरे जीवन आहे. माझे सहकारी जखमी होत होते, शहीद होत होते. मात्र, त्यांच्या त्यागाचा बदल घेण्याची भावना माझ्या मनात होती. माझ्या पाठीचा कणा मोडला, एक हात व पाय मोडला, तरीही आत्मविश्वास तुटू दिला नाही. भारतीय सेना विजयी होईपर्यंत बेभान होऊन लढत राहिलो.”
झिले सिंह यांच्याकडून पुलवामा आतंकवादी हल्ल्यातील रोमांचक अनुभव ऐकताना उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक भारावून गेले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी वंदे मातरम गीत सादर केले.