डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ पुस्तकाचे प्रकाशन‘एआय युगाचा वेध’ पुस्तक संतुलित अणि परिपूर्ण : डॉ. अरविंद नातू
पुणे : ‘एआय युगाचा वेध’ हे पुस्तक कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी समग्र वेध घेणारे, संतुलित आणि परिपूर्ण आहे. तंत्रज्ञानाची तोंडओळख आणि उपयुक्तता अशी सामान्य माणसाला आवश्यक ती माहिती डॉ. दीपक शिकारपूर यांनी सोप्या, सहज भाषेत मांडली आहे, असे गौरवोद्गार आयसरचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू यांनी काढले.
अमलताश बुक्सतर्फे डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे आणि ऑडिओ बुकचे प्रकाशन मंगळवारी (दि. १८) झाले. त्या वेळी डॉ. अरविंद नातू अध्यक्षपदावरून बोलत होते. डॉ. शिकारपूर यांचे हे ६९वे पुस्तक आहे. बी. एम. सी. सी. आवारातील डॉ. सायरस पूनावाला सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे, कल्याणी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश झोपे, बेलराईज इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजेश इंगळे, प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी मंचावर होते.
दृष्टीहिन व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी ज्ञान अवगत व्हावे या करिता हे पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपात नॅशनल फेरडेशन फॉर ब्लाईंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
डॉ. अरविंद नातू पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा रोबोटिक्स हे मानवाची जागा घेत नाहीत तर ते मानवाला अधिक सक्षम बनवितात. त्यामुळे भविष्यातील उद्योग-व्यवसाय मानव, रोबो, शाश्वत आणि हरितऊर्जा या चार गोष्टींवर अवलंबून आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना विवेकाशिवाय तंत्रज्ञान विनाशाकडे घेऊन जाते हा मूलमंत्र लक्षात ठेवून योग्य मूल्यमापन आणि समाजहित साधताना सारासार विवेकबुद्धी जोपासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नैतिक शिक्षण आणि गोपनियता सांभाळली गेली पाहिजे.
पुस्तकाविषयी बोलताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, कृत्रिज्ञ बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आज क्रांतिकारक बदल घडत असून ते आत्मसात करणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर तरुणांना सामाजिक प्रतिष्ठा लाभेल परंतु जीवनात यशस्वी होण्यासाठी कौशल्यविकास साधणे गरजेचे आहे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचे शिक्षण महत्त्वाचे आहे, हा मुद्दा डॉ. शिकारपूर यांनी अधोरेखित केला.
डॉ. प्रमोद काळे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक सहयोगी व्यवस्था म्हणून, एकत्रित केलेले ज्ञान वापरून उत्तर देत असते. पण ते उत्तर तुम्हाला आवश्यक आहे का याची निवड करताना सजगता बाळगणे आवश्यक आहे. कृत्रिज्ञ बुद्धिमत्तेच्या अतिवापराने सर्जनशीलताच खुंटणार आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतो. अशा वेळी ‘एआय युगाचा वेध’ हे पुस्तक केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर पालक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे.
योगेश झोपे, सुप्रिया बडवे, ॲड. अशोक पलांडे, प्रा. डॉ. राजेश इंगळे, सुश्रुत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो ओळ : ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) सुश्रुत कुलकर्णी, सुप्रिया बडवे, योगेश झोपे, डॉ. प्रमोद काळे, ॲड. अशोक पलांडे, डॉ. अरविंद नातू, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. राजेश इंगळे.
प्रति,
मा. संपादक
डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे आणि ऑडिओ बुकचे प्रकाशन मंगळवारी (दि. १८) झाले. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
