मराठी भाषेसाठी कार्य करणारे डॉ. गं. ना. जोगळेकर झुंजार नेते : प्रा. नीलिमा गुंडीमहाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रा. नीलिमा गुंडी यांचा गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्काराने गौरवमराठीच्या पालखीचे भोई तयार करण्यासाठी पुढची पिढी घडविणे आवश्यक : प्रा. नीलिमा गुंडी
पुणे : डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी मराठी भाषेविषयी दूरस्थ पद्धतीने गुरुकुल चालविले. जेथे शिक्षकच विद्यार्थी होते. पुणे विद्यापीठात कला शाखेव्यतिरिक्त मराठी भाषेचा अभ्यासक्रम बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती त्या काळी मराठी भाषेच्या आग्रहासाठी त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले. मराठी भाषेविषयी कार्य करणारे डॉ. जोगळेकर एक झुंजार नेते होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभ्यासक, लेखक व समीक्षक प्रा. नीलिमा गुंडी यांनी काढले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्काराने प्रा. नीलिमा गुंडी यांना आज (दि. २०) सन्मानित करण्यात आले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. ज्येष्ठ लेखिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते प्रा. गुंडी यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण होते. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, स्थानिक कार्यवाह सुनेत्रा मंकणी तसेच पराग जोगळेकर, उज्ज्वला जोगळेकर मंचावर होते. ग्रंथ, सन्मानपत्र आणि दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. जोगळेकर यांच्या मराठी भाषेच्या आस्थेविषयी माहिती विशद करून प्रा. नीलिमा गुंडी पुढे म्हणाल्या, आपल्या समाजात भाषाविषयक भूमिकेमध्ये एक प्रकारचा आंतरविरोध असल्याचे अनुभवास येते. एका बाजूने भाषेविषयी प्रेम असले तरी त्याच वेळी जागतिकिकरणानंतर मराठीसह इंग्रजी हा पर्याय न स्वीकारता शासन आणि समाजाने मराठी वगळून इंग्रजी हा पर्याय स्वीकारला होता. अशा वेळी मराठी अभ्यास परिषदेतर्फे अनेक परिसंवादांच्या माध्यमातून इंग्रजीसह मराठीही शिकण्याचा आग्रह धरण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे याविषयी पुन्हा एकदा नवजागरण सुरू झाले असून विधायक पावले उचलली जात आहेत. मराठीच्या पालखीचे भोई तयार करण्यासाठी पुढची पिढी घडविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यातूनच लहान मुलांसाठी मराठीविषयक उपक्रमांचे लेखन करत असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. गुंडी पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र साहित्य परिषद ही मराठी भाषेच्या संस्थात्मक कार्यांची गंगोत्री आहे. परिषदेच्या माध्यमातून सर्जनशील विचारकेंद्राच्या पातळीवरून कामकाज व्हावे, मराठी भाषेचा वाङ्मयीन इतिहास लेखन, विविध संशोधन प्रकल्प याविषयी भरीव कार्य होणे आवश्यक आहे.
डॉ. माधवी वैद्य म्हणल्या, मराठी भाषेसाठी कसून कार्य करणाऱ्या व्यक्तींना डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी कधीच निरुत्साही केले नाही. भाषा-विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे ते महनीय व्यक्ती होते. त्यांनी मराठी भाषेविषयक कार्य करणाऱ्या नवोदित साहित्यिक, कवींना समाजापुढे आणण्याचे मोलाचे कार्य केले. ते मराठी भाषा व साहित्य विषयाचा ज्ञानकोश होते. हाती घेतलेल्या कार्यावर जबरदस्त पकड असणारे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास जाणून असणारे, परखड शब्दात आपली मते व्यक्त करणारे आधारवड म्हणजे डॉ. गं. ना. जोगळेकर होत. मसाप आणि मराठी भाषा सातत्याने पुढे कशी जाईल याकरिता त्यांनी अखंडितपणे कार्य केले. डॉ. नीलिमा गुंडी यांना डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या नावे मिळालेला पुरस्कार मोलाचा आहे. डॉ. गुंडी या मराठी भाषेची हाक, गरज ओळखणारे व्यक्तीमत्त्व असून मराठी भाषेपुढील आव्हाने पेलण्यासाठी त्यांनी मसापसाठी आधारस्तंभ बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षपदावरून बोलताना योगेश सोमण म्हणाले, माझ्या लेखनावर डॉ. जोगळेकर यांचा सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी मराठी भाषेविषयी दिलेले शिक्षण मला आजतागायत पुरत आहे.
प्रास्ताविकात डॉ. स्वाती महाळंक यांनी डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या कार्याचा आढावा घेत मराठी भाषेसाठी संशोधनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येतो असे सांगितले. मराठी साहित्याकडे पाहण्याची मर्मदृष्टी डॉ. जोगळेकर सरांनी दिली असून परिषदेच्या कार्याची घडी बसवून देण्याचे श्रेय डॉ. जोगळेकर सरांना दिले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
पराग जोगळेकर यांनी पुरस्काराविषयी भूमिका मांडताना आपल्या वडिलांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांचा वारसा आजही मसापमध्ये जपला जात असल्याचे सांगून त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी प्रा. गुंडी यांचे नाव समर्पक असल्याचे सांगितले.
मान्यवरांचे स्वागत योगेश सोमण व डॉ. स्वाती महाळंक यांनी केले. मसापच्या विश्र्वस्तपदी निवड झाल्याबद्दल डॉ. माधवी वैद्य यांचा योगेश सोमण, डॉ. स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनेत्रा मंकणी यांनी केले.
फोटो ओळ : डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) पराग जोगळेकर, योगेश सोमण, डॉ. माधवी वैद्य, प्रा. नीलिमा गुंडी, डॉ. स्वाती महाळंक, उज्ज्वला जोगळेकर, सुनेत्रा मंकणी.
प्रति,
मा. संपादक
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्काराने प्रा. नीलिमा गुंडी यांना आज (दि. २०) सन्मानित करण्यात आले. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
डॉ. स्वाती महाळंक, प्रमुख कार्यवाह
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
