समाजातील नकारात्मक शक्तींविरुद्ध महिलांचा लढा आजही सुरूच : माधुरी मिसाळ

श्री भवानी माताजी जैन ट्रस्टतर्फे नवदुर्गा व आदर्श माता पुरस्कारांचे दिमाखदार वितरण;
पुणे व नागौर येथील मंदिरांच्या उभारणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहार यांचा विशेष सन्मान

पुणे : स्त्री ही केवळ त्यागमूर्ती नसून शक्ती, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. स्त्रीला केवळ आदर्शाच्या चौकटीत अडकवू नका. तिने आधीच मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. देवीने महिषासुर, चंड-मुंड यांसारख्या राक्षसांचा संहार केला, त्याचप्रमाणे आजची स्त्रीदेखील समाजातील अन्याय, विषमता आणि नकारात्मक शक्तींविरुद्ध समर्थपणे लढा देत आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले.

श्री भवानी माताजी जैन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (१८ ऑक्टोबर) श्री चामुंडा भवानी माताजी मंदिर, भिलारेवाडी, कात्रज येथे ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ व ‘आदर्श माता पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात झाला. पुरस्कारांचे वितरण माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मिसाळ बोलत होत्या.

आदर्श माता पुरस्काराने सुशीला मुथा व मंगला नाहार यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विमल बाफना, विद्या नाईकनवरे, एकता भन्साळी, डॉ. नीता मुंशी, प्रेरणा नाहार, ज्योती नाहार, भारती विजयजी भंडारी, नवीना पोरवाल व अनिता ओसवाल यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल नवदुर्गा सन्मान २०२६ प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात श्री भवानी माताजी जैन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहार यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे व नागौर येथे भव्य भवानी माताजी मंदिरांच्या उभारणीत त्यांचे दूरदृष्टीपूर्ण व यशस्वी नेतृत्व, मंदिरांच्या विकासासाठी तन-मन-धनाने केलेले योगदान, तसेच धार्मिक, सामाजिक व सेवाभावी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे नाहार समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाला नवी ओळख मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहार यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव, मातृशक्तीचा सन्मान आणि समाजातील प्रेरणादायी महिलांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या की, महिलांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. समाजाने महिलांकडून केवळ त्यागाची अपेक्षा न ठेवता त्यांना सन्मान, समान संधी आणि प्रोत्साहन दिले पाहिजे.

कार्यक्रमाला ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकांत नाहार, महामंत्री संपतराजजी नाहार, खजिनदार सुभाषजी नाहार, उपसचिव राजेश आर. नाहार, उपखजिनदार मनोज नाहार, महिला अध्यक्षा अंजली नाहार व युवा अध्यक्ष गौरव नाहार यांच्यासह ट्रस्टचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, महिला मंडळ, युवा कार्यकर्ते व नाहार परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त महिलांनी आपल्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनप्रवासाचे अनुभव कथन केले. त्यांच्या भावस्पर्शी मनोगतांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी, महिला शक्तीने, युवा कार्यकर्त्यांनी व समस्त नाहार परिवाराने विशेष परिश्रम घेतले. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मातृत्व, स्त्रीशक्ती व समाजसेवेचा गौरव करणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात झाला.
रत्ना दहिवेलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकाशजी नाहार यांनी आभार मानले.
फोटो ओळ : श्री भवानी माताजी जैन ट्रस्टतर्फे आयोजित नवदुर्गा व आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारप्राप्त महिलांसमवेत माधुरी मिसाळ, विशेष पुरस्काराने सन्मानित संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहार, महिला अध्यक्षा अंजली नाहार व ट्रस्टचे पदाधिकारी.

प्रसिद्धीसाठी विनंती
प्रति,
मा. संपादक महोदय,
श्री भवानी माताजी जैन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने आयोजित नवदुर्गा सन्मान २०२६ व आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वरील वृत्तास आपल्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात छायाचित्रासह ठळक प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button