पुणे : पुण्यातील सुप्रसिद्ध गोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सांगितीक सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला. टिळक स्मारक मंदिर येथे या गायन-वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यातील सुप्रसिद्ध शहनाई वादक पं. प्रमोद गायकवाड आणि गोडसे वाद्यवादन विद्यालयाच्या विद्यार्थिनी, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक अंजली सिंगडे-राव यांच्या शहनाई-व्हायोलिन सहवादनाने झाली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात राग मधुवंतीतील विलंबित एकतालातील गत ऐकवून केली. त्यानंतर मध्य लय तीनताल व द्रुत तीनतालाचे सादरीकरण करताना दोन्ही वाद्यांमधील अनोखे आविष्कार दर्शविले. गुरू मधुकर गोडसे यांनी शिकवलेली एक गत ऐकवून सहवादनाची सांगता बनारसी दादरा सादर करून केली. बनारस घराण्याचे तबलावादक पंडित रवी शर्मा यांनी त्यांना समर्पक साथसंगत केली.
अखिल भारतीय गांधर्व महामंडळ, मुंबईचे रजिस्ट्रार, सुप्रसिद्ध तबलावादक विश्वास जाधव यांचे तबलावादन रंगले. त्यांनी तबलावादनाची सुरुवात तीनतालाने करत दीपचंदीचे बोल, उस्ताद अमीर हुसेन खान यांची रचना तसेच संवादी गत आदी वैशिष्ट्ये वादनातून रसिकांसमोर मांडली. त्यांना पं. माधव मारणे यांनी सुरेल लेहरा साथ केली. तर जितेश झंवर यांनी तबला सहवादन केले.
त्यानंतर अक्षय सोमण यांचे सुमधुर व्हायोलीन वादन झाले. त्यांनी राग बिहागचे वैशिष्ट्य उलगडत प्रभावी सादरीकरण केले. व्हायोलिनवर सादर केलेल्या ‘घेई छंद मकरंद’ या नाट्यगीताने रसिकांना मोहित केले. त्यांना अभिजीत बारटक्के यांनी तबला साथ केली.
गोडसे वाद्यवादन विद्यालयाचे विद्यार्थी आणि विख्यात संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांच्या संवादिनी वादन मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांनी राग पुरिया कल्याणचे स्वरूप उलगडून दाखवताना जोड रागासह रागाच्या स्वतंत्र अस्तित्वाचे दर्शन घडविले. मिश्र काफी राग ऐकविताना कुंडलकर यांनी मध्यलय एकताल आणि अति द्रुत तीनताल सादर करून रसिकांना स्तिमीत केले. त्यांना प्रणव गुरव (तबला), सानिका पिंगळे (तानपुरा) यांनी साथ केली.
अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध गायक अतुल खांडेकर यांच्या मैफिलीने झाली. त्यांनी राजेश्री रागातील बडा ख्याल ऐकविताना पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या रचना सादर केल्या. त्यानंतर पंडित रामाश्रय झा यांची मध्यलयीतील बंदिश ऐकविली. विख्यात गायिका विणा सहस्त्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या अतुल खांडेकर यांनी विणाताईंनी रचलेला तराणा सादर करून रसिकांना आनंद दिला. यानंतर खांडेकर यांनी राग मधुकंसमधील ‘आयी चांदनी रात शरद की’ ही रचना प्रभावीपणे सादर करून कार्यक्रमाची सांगता ‘मान्य करावी दासाची सेवा’ या भैरवीने केली. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर तर तबल्यावर प्रणव गुरव यांनी समर्पक साथसंगत केली. भक्ती खांडेकर, श्रीजीत दाणी आणि चैतन्य सरवटे यांनी सहगायन व तानपुरा साथ केली.
फोटो ओळ : (शहनाई-व्हायोलिन सहवादन) गोडसे वाद्यवादन विद्यालय आयोजित कार्यक्रमात (डावीकडून) पं. रवी शर्मा, पं. प्रमोद गायकवाड, अंजली सिंगडे-राव.
फोटो ओळ : (व्हायोलिनवादन) गोडसे वाद्यवादन विद्यालय आयोजित कार्यक्रमात (डावीकडून) अभिजीत बारटक्के, अक्षय सोमण.
फोटो ओळ : (तबलावादन) गोडसे वाद्यवादन विद्यालय आयोजित कार्यक्रमात जितेश झंवर, विश्वास जाधव, पं. माधव मारणे.
फोटो ओळ : (संवादिनीवादन) गोडसे वाद्यवादन विद्यालय आयोजित कार्यक्रमात प्रणव गुरव, सुयोग कुंडलकर.
फोटो ओळ : (गायन) गोडसे वाद्यवादन विद्यालय आयोजित कार्यक्रमात प्रणव गुरव, श्रीजीत दाणी, चैतन्य सरवटे, अतुल खांडेकर, भक्ती खांडेकर, सुयोग कुंडलकर.