- अभिनेते रझा मुराद यांचे प्रतिपादन; बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण व गुणवंतांचा गौरव
चांगल्या व सुदृढ समाजासाठी एकत्रित कुटुंब पद्धतीचा अवलंब गरजेचा
- आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांचे प्रतिपादन; बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण व गुणवंतांचा गौरव
प्रत्येकाच्या योगदानातूनच समाजामध्ये होत असते व्यापक परिवर्तन
- गुरुदेव रमणिक मुनीजी यांचे प्रतिपादन; बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण व गुणवंतांचा गौरव
स्वत:च्या प्रगतीसह समाजाच्या हितासाठी दिलेले योगदान अधिक महत्वाचे
- शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांचे प्रतिपादन; बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण व गुणवंतांचा गौरव
ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्यांची शिकवण देण्यासाठी सूर्यदत्त कटिबद्ध
- प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण व गुणवंतांचा गौरव
समाज परिवर्तनात योगदान देणाऱ्यांचा ‘सूर्यदत्त’कडून सन्मानाचा स्तुत्य उपक्रम
- प्रा. डॉ. पराग काळकर यांचे प्रतिपादन; बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण व गुणवंतांचा गौरव
पुणे: “बदलत्या जीवनशैलीत एकत्र कुटुंबपद्धती, माणुसकी, चांगले आचरण आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधिक अधोरेखित करण्याची गरज आहे. एकत्रित कुटुंब हीच संस्कारांची पहिली शाळा असून, चांगले वागणे, एकमेकांना आधार देणे आणि समाजाच्या जडणघडणीत योगदान देणे ही मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सुषमा व प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया हे दाम्पत्य हेच काम गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. नव्या पिढीला आदर्श, मूल्ये, संस्कार आणि सामाजिक जाणिवेची शिकवण देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सीरत्न वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महर्षीनगर येथील शिवशंकर सभागृहातील साधना सदनमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व ‘आयसर’चे सल्लागार डॉ. अरविंद नातू, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. सोमा घोष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा व डॉ. किमया गांधी, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, स्वर्णिमा सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.
या पुरस्कारांमध्ये गुरुदेव परमपूज्य रमणिक मुनीजी महाराज साहेब यांना ‘सूर्यरत्न दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया, सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’, परमपूज्य हिमानीजी महाराज साहेब यांना ‘सूर्यदत्त साध्वीरत्न राष्ट्रीय पुरस्कार’, पद्मश्री डॉ. सोमा घोष यांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार’, पन्नालाल मोतीलाल कोठारी व मोतीबन परिवाराला ‘सूर्यदत्त बन्सीरत्न आदर्श परिवार पुरस्कार’, श्रीमती सरला व पृथ्वीराज धोका यांना ‘सूर्यदत्त बन्सीरत्न आदर्श मातापिता पुरस्कार’, श्रीमती विमल अनिल बाफना ‘सूर्यदत्त बन्सीरत्न समाज शिरोमणी ज्ञानसेवा पुरस्कार’, सुदेशकुमार चंपालाल साकलेचा यांना ‘सूर्यदत्त बन्सीरत्न समाज शिरोमणी पुरस्कार’, श्रीमती निर्मला चंद्रकांत छाजेड यांना ‘सूर्यदत्त बन्सीरत्न समाजरत्न पुरस्कार’, कुंदनलाल दर्डा व मोहनलाल कन्हैयालाल संचेती यांना ‘सूर्यदत्त बन्सीरत्न समाजभूषण पुरस्कार’, तर आशीष रमणलाल बोरा, मनोज मदनलाल छाजेड व सुनील पोपटलाल नहार यांना ‘सूर्यदत्त बन्सीरत्न मानवसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या जैन समाजातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक व स्कार्फ देऊन गौरविण्यात आले.
डॉ. लोकेश मुनीजी म्हणाले, “समाज घडविण्यासाठी केवळ वैयक्तिक यश महत्त्वाचे नसून, कुटुंब आणि समाजाप्रती असलेली जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. एकत्र कुटुंबपद्धतीतून हीच माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना पुढे जाते. आजही काही कुटुंबात अनेक पिढ्या एकत्र राहत असून, परस्परांमध्ये प्रेम, आदर, समंजसपणा आणि सहकार्याची भावना जपली जाते, हे पाहून आपल्याला विशेष आनंद होतो. अहिंसा, मानवता, समाजसेवेची भावना जागृत ठेवत प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावे. समाजातील आदर्श व्यक्तींना विद्यार्थ्यांसमोर सन्मानित करून, तसेच विद्यार्थ्यांचा गौरव करून समाज घडविण्याचे काम चोरडिया दाम्पत्याच्या हातून होत आहे.”
परमपूज्य गुरुदेव रमणिक मुनीजी यांनी उपस्थितांना आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना सांगितले की, समाज घडविण्याची प्रक्रिया ही एका दिवसात किंवा एका व्यक्तीच्या प्रयत्नातून होत नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने केलेले छोटे योगदान समाजाच्या व्यापक परिवर्तनाला हातभार लावत असते. त्यामुळे कोणतेही चांगले काम छोटे किंवा महत्त्वहीन समजू नये. लहान मुलांना आज योग्य संस्कार, चांगले मार्गदर्शन आणि पुरेसा वेळ दिला, तर भविष्यात हीच मुले समाजासाठी चांगले कार्य करू शकतात. पालक आणि समाजाने त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आपण शक्य तितके चांगले पेरले, तर त्याचे चांगले परिणाम भविष्यात समाजाला नक्कीच मिळतील, असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेण्यासोबतच त्यांना त्यांच्या करिअर आणि जीवनातील योग्य संधी व मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरतो. त्यासोबतच समाजात चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर थाप द्यायला हवी. त्यामुळे त्यांना आणखी काम करण्यसाठी प्रोत्साहन मिळते. ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळावेत, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन अशा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करत असते. अभ्यास, मेहनत, व्यायाम, आई-वडिलांचा, जेष्ठांचा सन्मान केला पाहिजे. माता-पिता व गुरूंचे स्मरण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यांचे संस्कार ही आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे.”
डॉ. अरविंद नातू म्हणाले, “समाजाने आपल्याला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर खूप काही दिलेले असते. शिक्षण, संधी, संस्कार, अनुभव आणि माणसांचे सहकार्य यामुळेच आपली जडणघडण होत असते. त्यामुळे समाजाकडून मिळालेल्या या योगदानाची जाणीव ठेवून आपणही आपल्या परीने समाजाला काहीतरी परत देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. मिळालेले यश केवळ स्वतःपुरते न ठेवता त्याचा उपयोग इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करणे, हीच खऱ्या अर्थाने समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे.”
प्रा. डॉ. पराग काळकर म्हणाले, “समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्ती सातत्याने आणि निस्वार्थपणे कार्यरत असतात. शिक्षण, सामाजिक सेवा, उद्योग, कला, आरोग्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या व्यक्ती आपल्या कार्यातून समाजाच्या प्रगतीला हातभार लावत असतात. मात्र, त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली जातेच असे नाही. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन आणि समाजासमोर त्यांच्या योगदानाची ओळख निर्माण करून देण्यासाठी होणारा गौरव महत्त्वाचा ठरतो. ‘सूर्यदत्त’चा हा उपक्रम त्यासाठीच महत्वाचा आहे.”
साध्वी हिमानीजी महाराज यांनीही उपस्थितांना आशीर्वाद देत मार्गदर्शन केले. डॉ. सोमा घोष, पन्नालाल मोतीलाल कोठारी, पृथ्वीराज धोका, श्रीमती विमल अनिल बाफना, सुदेशकुमार चंपालाल साकलेचा, श्रीमती निर्मला चंद्रकांत छाजेड, कुंदनलाल दर्डा, मोहनलाल कन्हैयालाल संचेती, आशीष रमणलाल बोरा, मनोज मदनलाल छाजेड व सुनील पोपटलाल नहार यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. श्वेता राठोड-कटारिया यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.