- युवक काँग्रेसचे शिवराज मोरे यांची मागणी; निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसह बेरोजगारी आणि सरकारी रिक्त पदांचा प्रश्नही उपस्थित
पुणे, ता. २८ : मतदार याद्यांतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत समोर आलेल्या बाबी गंभीर असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी सोमवारी पुण्यात केली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, माध्यम प्रमुख अक्षय जैन, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, पुणे ग्रामीण युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, प्रदेश सरचिटणीस गणेश उबाळे, उमेश कंधारे, विश्वजीत जाधव, दिलीपसिंह देशमुख, प्रदेश सचिव प्रियंका चौधरी, पंकज पोळ, आनंद दासा आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पांढरे मास्क परिधान करून आणि हातांना निळा रंग लावून प्रतीकात्मक निषेध नोंदविला.
शिवराज मोरे म्हणाले, ‘‘लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत असणे आणि त्याचा मतदानाचा अधिकार अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदारांची नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे यासारख्या मूलभूत प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगातीलच दोन आयुक्तांनी वारंवार आक्षेप नोंदविल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे केवळ राजकीय आरोप म्हणून न पाहता पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.’’
द इंडियन एक्स्प्रेसच्या तपासणीनुसार निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत मतदार नोंदणी, नावे वगळणे, फॉर्म-६ मधील बदल तसेच मतदारयादीच्या डेटाबेससंदर्भातील विविध निर्णयांवर किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदविले आहेत. या वृत्तानंतर निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेबाबतही राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घडामोडींनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
‘‘राहुल गांधी यांनी सातत्याने मतदार याद्यांतील कथित अनियमितता आणि ‘वोट चोरी’चा मुद्दा देशासमोर मांडला आहे. आता निवडणूक आयोगाच्या अंतर्गत प्रक्रियेबाबतच गंभीर प्रश्न समोर येत असतील, तर त्यांची उत्तरे देशाला मिळाली पाहिजेत. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रत्येक निर्णय पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत झाला पाहिजे,’’ असे शिवराज मोरे यांनी नमूद केले.
महाराष्ट्रातील मतदार याद्यांबाबतही युवक काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. मतदारांची नावे यादीतून गायब होणे, मतदारांच्या नोंदींबाबत निर्माण होणारा गोंधळ तसेच नाव नोंदणी आणि वगळण्याच्या प्रक्रियेबाबत येणाऱ्या तक्रारींची निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घ्यावी. महाराष्ट्रातील मतदार याद्यांबाबत ज्या तक्रारी आणि शंका उपस्थित होत आहेत, त्यांची पारदर्शक पद्धतीने पडताळणी झाली पाहिजे. कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाणार नाही आणि प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहील, याची खात्री निवडणूक आयोगाने करावी,’’ अशी मागणी त्यांनी केली.
सरकारी रिक्त पदे जाहीर करा, तातडीने भरती करा
देशातील बेरोजगारीबरोबरच महाराष्ट्रातील एमपीएससी आणि विविध सरकारी विभागांमधील रिक्त पदांचा प्रश्न युवक काँग्रेसने पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महाराष्ट्रातील लाखो युवक स्पर्धा परीक्षांची वर्षानुवर्षे तयारी करत आहेत. विविध सरकारी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याचा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. राज्य सरकारने प्रत्येक विभागातील मंजूर पदे, सध्या भरलेली पदे आणि रिक्त पदांची अद्ययावत आकडेवारी सार्वजनिक करावी. रिक्त पदांसाठी कालबद्ध भरती कार्यक्रम जाहीर करून भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी. सरकारने रिक्त पदांची माहिती जाहीर करून भरती प्रक्रियेला तातडीने गती दिली नाही, तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल,’’ असा इशारा मोरे यांनी दिला.