September 24, 2026

संगीत चिकित्सा क्षेत्रात पदविका अभ्यासक्रमाची नवी संधी

0
IMG-20260907-WA0051
Spread the love
  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यतेने १५ सप्टेंबरपासून ‘सुर संजीवन’ पदविका अभ्यासक्रम
  • डॉ. पंडित शशांक कट्टी यांची पत्रकार परिषदेत माहिती; रविवारी (ता. १३) संगीतविषयक विनामूल्य सेमिनार

पुणे, ता. ७ : संगीत ही केवळ कला नाही, तर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी उपचारपद्धती आहे. ही बाब लक्षात घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यतेने सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे ‘सुर संजीवन (क्युरेटिव्ह म्युझिक)’ हा संगीत चिकित्सा (म्युझिक थेरपी) पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. १५ सप्टेंबरपासून या अभ्यासक्रमाला सुरुवात होत असून, याविषयी संगीतसाधकांना अधिक माहिती व्हावी, यासाठी येत्या रविवारी (ता. १३) सायंकाळी ५ ते ७ यावेळेत कर्नाटक संघ, दुसरा मजला, सिद्धार्थ टॉवर्स, कोथरूड पुणे येथे संगीतविषयक विनामूल्य सेमिनारचे आयोजन केले आहे, अशी माहिती सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टचे संस्थापक व ज्येष्ठ सतारवादक डॉ. पं. शशांक कट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. पं. शशांक कट्टी म्हणाले, “संगीत ही एक प्रभावी उपचारपद्धती आहे. या अभ्यासक्रमातून वैज्ञानिक आधारावर संगीत चिकित्सेचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. संगीताच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची ही संधी आहे. हा अभ्यासक्रम जगभरात ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहे, तसेच पुणे आणि मुंबई येथे ऑफलाइन स्वरूपातही उपलब्ध असणार आहे. एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे (शासकीय मान्यताप्राप्त) पदविका प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे त्यांच्या करिअरच्या उत्तम संधी निवडण्यास मदत होईल. संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच डॉक्टर, समुपदेशक, विशेष बालशिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ आणि समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. संगीताच्या माध्यमातून आरोग्य, समतोल आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा ‘सुर संजीवन’ अभ्यासक्रम हा वास्तवात उपचारक संगीत क्षेत्रात नवा अध्याय ठरेल, अशी अपेक्षा आहे.”

डॉ. संगीता सांगवीकर म्हणाल्या, “आतापर्यंत डॉ. कट्टी यांनी ४५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यापैकी ८० ते ९० विद्यार्थी हे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत. अनेकजण संगीत चिकित्सा प्रत्यक्ष वापर करीत आहेत. आता नव्याने सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमाची सुरवात सप्टेंबरपासून होणार असून, त्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. अभ्यासक्रमाची रूपरेषा, अभ्यास पद्धती, प्रवेश प्रक्रिया, पात्रता, शुल्क आदींबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी रविवारी (ता. १३) मोफत सेमिनार होत आहे. संगीत चिकित्सा क्षेत्रातील महत्त्व, विविध क्षेत्रांतील उपयोग आणि विद्यार्थ्यांसाठीच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहिती व प्रवेशासाठी डॉ. पं. शशांक कट्टी (९८२००४६९२०) किंवा डॉ. संगीता सांगवीकर (९९६००६१०२९) यांच्याशी संपर्क साधावा किंवा https://ycmou.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.”

डॉ. पं. शशांक कट्टी म्हणाले, “याआधी म्युझिक थेरपीचा सर्टीफिकेट अभ्यासक्रम होता. पण आताच्या अभ्यासक्रमाला शासनाची मान्यता मिळाल्याने जे विद्यार्थी कोर्स करतील त्यांना सरकारी मान्यता मिळणार असून ते म्युजिक थेरपी विषयात प्रॅक्टिस करू शकतात. आपल्याकडे या थेरपीबद्दल पुरेशी जागरुकता नाही. यामध्ये तीन प्रकारचे संगीत शिकवले जाणार आहे. यात होलिस्टिक (योग, प्राणायाम) शारीरिक व्याधींचे निराकरण होण्यासाठी उपयोग, आरोग्य संगीत (क्लासिकल संगीत, रागांचे संगीत) मनावर संगीताचा चांगला परिणाम व्हावा यासाठी उपयुक्त असे संगीत आणि रागसंगीत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या थेरपीच्या उपयुक्ततेबाबत बरेच संशोधन झालेले असून, अर्थरायटिस, गुडघेदुखी, अस्थमा, वेळेच्या आधी जन्माला आलेल्या बालकांचा विकास यांसारख्या समस्यांवर संगीत थेरपीने यशस्वी उपचार केले आहेत. तेव्हा संगीत विषयात काम करु इच्छिणाऱ्यांनी हा डिप्लोमा कोर्स नक्की करायला हवा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी