स्नेहाच्या एका सूत्रात बांधले संपूर्ण राष्ट्र!भारत भारती, पुणेचा रक्षाबंधनातून राष्ट्रीय एकात्मतेचा भावस्पर्शी संदेश
पुणे : भारत-भारती, पुणेतर्फे आयोजित रक्षाबंधन आणि ‘विविध भाषा-भगिनीं’च्या महाभजन संध्येने ‘विविधतेत एकता’ हा केवळ शब्द नसून तो भारताचा आत्मा आहे, याची प्रचिती अनुभवायला मिळाली. दिव्यांगांच्या हातून बांधण्यात आलेले प्रेमाचे रेशीमबंध आणि देशाच्या विविध प्रांतांतील भगिनींनी त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत सादर केलेली भजने याद्वारे संपूर्ण भारत एकाच छताखाली अवतरल्याचा अभूतपूर्व अनुभव उपस्थितांनी घेतला.
सहकार नगरमधील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील विजय तेंडुलकर सभागृहात या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, पंजाब प्रांतासह नेपाळमधून आलेल्या भगिनींनी आपापल्या बोलीभाषेत भजने सादर केली तेव्हा प्रांतांच्या अन् भाषांच्या सीमा गळून पडल्या; उरला तो फक्त भारतीयत्वाचा भाव! भजन, संस्कृती, रक्षासूत्र आणि स्नेहमिलनाच्या या संगमाने संपूर्ण वातावरण भावपूर्ण व देशभक्तीच्या रंगात रंगवून गेले. काश्मिरी भगिनींनी मातृभाषेत सादर केलेल्या भजनाने प्रथम क्रमांक पटकाविला तर केरळी भाषेतील भजनाला द्वितीय आणि गुजराती भाषेतील भजनाच्या सादरीकरणाला तृतीय क्रमांक मिळाला.
दिव्यांग बालकांच्या स्पर्शाने उजळले स्नेहाचे नाते…
कार्यक्रमाचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण ठरला तो म्हणजे ‘सक्षम दिव्यांग सेवा केंद्रा’तील बालकांचा सहभाग. या बालकांनी उपस्थितांच्या मनगटावर ‘रक्षासूत्र’ बांधले, तेव्हा तो केवळ धागा राहिला नाही, तर तो समानता, सामाजिक समरसता आणि अथांग प्रेमाचा महामंत्र बनला.
कर्तव्यातून राष्ट्र जोडण्याचा संकल्प…
भारत-भारती पुणेचे अध्यक्ष अचल जैन यांनी प्रास्ताविकात भारत-भारतीची उद्दिष्ट्ये मांडताना सांगितले की, असे उपक्रम केवळ सण साजरे करण्याचे माध्यम नसून, ते समाजात राष्ट्रप्रेमाची आणि एकात्मतेची जोडणी करणारे सेतू आहेत. सर्व भाषिक भजनी मंडळांच्या भक्तीमय सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले.
प्रमुख वक्ते सरदार पटेल विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वसंत पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, ‘अखंड भारत’ आणि राष्ट्राप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील अचंबित करणारे अनेक प्रसंग उलगडून सांगितले.
या सोहळ्यास भारत-भारतीचे राष्ट्रीय कार्यकारी संचालक व कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, की भारत भारतीतर्फे पुढचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करावा.
राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष शिरीष घुडे, महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष अतुल शेवडे, प्रदेश महिला आघाडी संयोजक गायत्री चित्रगीमठ आणि पुणे विभागाचे सचिव समीर पंड्या यांसारख्या अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संस्कृती, भक्ती आणि राष्ट्रीय भावनेचा हा त्रिवेणी संगम उपस्थितांच्या हृदयात स्नेहाची आणि अभिमानाची एक नवी ज्योत पेटवून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण ‘वंदे मातरम्’च्या गायनाने झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव समीर पंड्या, मेघा चिंतल, किरण खंडेलवाल, चेतना पंड्या, अभय कुमार, सूरजपाल सिंह, जितेंद्र कुमार सिंह, संजय हसीजा, परमेश्वर नायक, एन. पी. राजन, अविनाश उपलंची, योगेंद्र जगताप यांच्यासह सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. रीटा गांधी, वंदना पासकंठी यांनी सुंदर सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : भारत-भारती आयोजित कार्यक्रमात प्रथम क्रमांक पटकाविणारा काश्मिरी महिलांचा संघ आणि मान्यवर.
प्रति,
मा. संपादक
भारत-भारतीतर्फे रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
अचल जैन, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
