September 25, 2026

पुण्याच्या बहिणींच्या राखीने सीमेवर रंगला आनंदोत्सव; सैनिकांसोबत साजरे झाले रक्षाबंधन!

0
IMG-20260828-WA0053
Spread the love

-पुंछ, केरन आणि उरीतील सैनिकांच्या मनगटावर बांधल्या हजारो राख्या

पूंछ / जम्मू-काश्मीर : देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर पुणेकरांच्या प्रेमाची राखी बांधत यंदाचे रक्षाबंधन अनोख्या आणि भावनिक वातावरणात साजरे करण्यात आले. श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेच्या वतीने आयोजित ‘पुण्यापासून सीमेपर्यंत… राखीच्या धाग्यातून राष्ट्राशी नातं!’ या रक्षाबंधन यात्रेअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील पुंछ, केरन आणि उरी बॉर्डर परिसरात तैनात सैनिकांना राख्या बांधण्यात आल्या.

पुण्यातून तब्बल २,५०० किलोमीटरचा प्रवास करत ही रक्षाबंधन यात्रा सीमेवर पोहोचली. पुणे शहरातील नागरिक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून संकलित करण्यात आलेल्या सुमारे सात ते आठ हजार राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. सैनिकांच्या मनगटावर राखी बांधताना त्यांना मिठाई देऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सैनिक आणि यात्रेतील सहभागी यांच्यात भावनिक संवादही झाला.

सीमेवर कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या मनगटावर राखी बांधताना उपस्थितांनी त्यांच्या शौर्याला सलाम केला. देशवासीयांच्या सुरक्षिततेसाठी त्याग करणाऱ्या सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण भावूक करणारा ठरला.

या उपक्रमाला श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सूरज परदेशी, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, सागर बोदगिरे ,आम्ही मावळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष नरेंद्र डोईफोडे तसेच सीमेवरील अधिकारी आणि भारतीय सैनिक,शाळेतील विद्यार्थीनी उपस्थित होते.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण न राहता, देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभ्या असलेल्या प्रत्येक सैनिकाशी भावनिक नाते जोडणारा सण व्हावा, या उद्देशाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पुणेकरांनी प्रेमाने दिलेल्या राख्या थेट सीमेवर पोहोचवून सैनिकांच्या मनगटावर बांधण्यात आल्याने ‘देशासाठी उभ्या असलेल्या सैनिकांशी आपलेही एक नाते आहे’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

पुण्यापासून सुरू झालेला हा स्नेहाचा प्रवास सीमेवर सैनिकांच्या मनगटावर राखी बांधून पूर्ण झाला. राखीच्या प्रत्येक धाग्यातून पुण्याच्या बहिणींचे प्रेम, आशीर्वाद आणि देशरक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

सीमेवर रक्षाबंधनाचा हा सोहळा स्नेह, आनंद आणि राष्ट्रभावनेने भारावून गेला. पुण्याच्या बहिणींच्या राख्यांनी सैनिकांच्या मनगटावर प्रेमाचा धागा बांधत पुणे आणि सीमेवरील सैनिक यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी