September 25, 2026

संजीवनी करंडक वीर शिवराज मंडळ ट्रस्टने पटकावलासंजीवनी मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

0
IMG-20260828-WA0062
Spread the love

पुणे : संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संजीवनी करंडक सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धा २०२५’ चा पारितोषिक वितरण समारंभ शिवदर्शन येथील स्व. राजीव गांधी ई-लर्निंग प्रेक्षागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्पर्धेतील मानाचा ‘संजीवनी करंडक’ वीर शिवराज मंडळ ट्रस्टने पटकावला.

या कार्यक्रमास संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय विद्वांस, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, आदर्श मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, दर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश घोश, नगरसेवक महेश वाबळे, शिवव्याख्याते सौरभ कर्डे, राजेंद्र भिडे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्ताविकात संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय विद्वांस यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यांच्या माध्यमातून कलात्मकता, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक मूल्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात नटरंग संस्थेच्या कलाकारांनी ‘त्रिपुंड’ या कार्यक्रमाची प्रभावी भरतनाट्यम प्रस्तुती सादर केली. कलावंतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यावेळी श्रीकांत शेटे यांनी संजीवनी मित्र मंडळाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनासोबतच कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे काम मंडळ सातत्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गणेश मंडळांचे आणि विजेत्यांचे अभिनंदन केले.

स्पर्धेतील विजेत्या मंडळांना एकूण दीड लाख रुपयांची पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि प्रशस्तिपत्रे देऊन गौरविण्यात आले. याशिवाय स्पर्धेतील विशेष पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम दिग्दर्शक – गणेश लोणारे, सर्वोत्तम संहिता लेखन – पियूष शहा आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक – क्षितीज रंधीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

पारितोषिक वितरण सोहळ्यास विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण लाभले.

गणेशोत्सवातील देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश, कलात्मक अभिव्यक्ती आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा संजीवनी मित्र मंडळाचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी