September 25, 2026

प्रा. यास्मिन शेख यांच्या भाषासंरक्षणाच्या भूमिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ मिळावे

0
IMG-20260828-WA0073
Spread the love

एमकेसीएलचे प्रमुख सल्लागार डॉ. विवेक सावंत यांचे उद्गार

प्रा. यास्मिन शेख यांच्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन

पुणे : प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषेच्या जागरुक संरक्षक होत्या. त्यांची भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन संरक्षणाची भूमिका, नव्या काळात त्याच जबाबदारीने आता तंत्रज्ञानाने स्वीकारणे, हीच खरी आदरांजली ठरेल आणि एआय प्रभावित पिढीसाठी ती प्रेरणा ठरेल, असे उद्गार महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे डॉ. विवेक सावंत यांनी शुक्रवारी येथे काढले.
ज्येष्ठ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्यासाठी श्रद्धांजलीसभेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या शोकसभेत डॉ. सावंत बोलत होते. प्रा. शेख यांच्या कन्या प्रा. रूमा बावीकर, डॉ. शमा भागवत, नात जुई हे कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, शेखबाईंच्या व्यक्तिमत्त्वात असे काही होते, की त्या जणु अमरत्व घेऊन आल्या आहेत, असे वाटावे. त्यांच्यामध्ये पुराणविदुषीपण होते. त्यामुळे पार्थिव स्वरूपात नसोत, पण त्यांचा प्रभाव सदैव राहील. जे ज्ञानवंत समाजाला जागरुक करतात, शिक्षित करतात, भाषाप्रेमाचे मूल्य रुजवतात, त्यांचे प्रभाव प्रदीर्घकाळ राहतात. शेखबाईंचा प्रभाव असाच टिकणार आहे. भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन एवढ्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नाही तर मराठी भाषेच्या त्या संरक्षक होत्या, मराठी भाषाप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक होत्या, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आता मातृभाषेच्या संरक्षकाच्या भूमिकेला आधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ देणारा महाप्रकल्प गरजेचा आहे. तीच शेखबाईंना खरी आदरांजली ठरेल.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, मराठीवर श्रीमंत प्रेम शेखबाईंनी केले. मराठीचा शब्दसंभार आस्थेने सांभाळणाऱ्या त्या भाषायोगिनी होत्या.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नांदी संमेलनाच्या निमित्ताने शेखबाईंशी झालेल्या भेटीचा उल्लेख केला. अतिशय शांत, समाधानी आणि संयमित असे परफेक्ट कॅरेक्टर त्यांच्या रूपाने भेटले, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी राज्यस्तरीय शुद्धलेखन समितीच्या बैठकांमधील प्रा. शेख यांच्या आठवणींना उजाळा दिला. आवेश, अभिनिवेश, कठोरपणा न आणताही आपले मत ठामपणाने आणी संयमितपणाने मांडणे, ही शेखबाईंची विशेषता होती. संवाद साधण्याची त्यांची ओढ अखेरपर्यंत किती तीव्र होती, याचेही सोदाहरण विवेचन महाळंक यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर म्हणाले, अभिजात परंपरेतील एक पर्व संपल्याची भावना असून, मराठी व्याकरण पोरके झाले आहे.
शेख यांच्या कन्या रूमा बावीकर म्हणाल्या, आलेल्या प्रत्येक पत्राला स्वहस्ताक्षरात उत्तरे देणे, हे आईला कर्तव्य वाटत असे. अतिशय शिस्तप्रिय, शांत, समाधानी वृत्तीने ती जगली. शब्दकोडी सोडवणे, आईला आवडत असे. प्रत्येक गोष्ट अतिशय मनापासून, निरलसपणे आणि जिव्हाळ्याने करणे, हा तिचा स्थायीभाव तिला माणसांशी जोडून ठेवणारा होता.
शेख यांची नात जुई भागवत यांनी लहानपणापासून गोष्टी सांगणारी आज्जी अतिप्रिय असल्याचे सांगितले. सई परांजपे लिखित शेपटीचा शाप ही गोष्ट आजी इतकी रंगवून सांगत असे, की मी तिला सारखी तीच गोष्ट सांगण्याचा आग्रह करत असे, अशी आठवण जुई यांनी जागवली. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आजीकडून छान छान पुस्तकांची भेट मिळत असे, असेही त्या म्हणाल्या. आजी अप्रतिम वीणकाम करत असे आणि तिने माझ्यासाठी विणलेले स्वेटर मला आजही ऊब देतात. निरपेक्ष प्रेमाचा एक अखंडित स्रोत म्हणजे आज्जी होती. वयाच्या ९० व्या वर्षीही ती बिझी होती. असे बिझी असणे मलाही आवडेल, असे त्या म्हणाल्या.
मुस्मिम सत्यशोधक मंडळाचे शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, मराठी भाषा, व्याकरण, शुद्धलेखनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या ताईंना मंडळातर्फे पुरस्कार देण्याचे भाग्य आम्हाला उशिरा का होईना, पण मिळाले, याचा आनंद वाटतो.
माजी आयकर आयुक्त संग्राम गायकवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठीच्या प्रशिक्षण केंद्रात मराठी भाषा, व्याकरण शिकविण्यासाठी शेखबाई आल्या आणि आम्हाला मराठीची गोडी लागली, याची कबुली प्रातिनिधिक स्वरुपात दिली. अतिशय सोप्या, रसाळ पद्धतीने व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवण्याची त्यांची पद्धत भाषेचे प्रेम विद्यार्थ्यांमध्ये सहज संक्रमित करणारी होती, असे ते म्हणाले.
संपादक भानू काळे यांनी स्वतःच्या दुःखाचे कुठलेच भांडवल न करता, आयुष्यभर मराठी भाषेवर, मातृभाषेवर प्रेम करा, एवढा संदेश देणाऱ्या शेखबाई मातृरूपात भेटल्या, हे सुदैव, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. शेखबाईंचे मानसपुत्र दिलीप फलटणकर यांनी मी आईपण गमावलं आणि पोरकेपण अनुभवत आहे, अशा शब्दांत भावना मांडल्या.
डॉ. उज्ज्वला गोखले, डॉ. सागर देशपांडे, के. जी. पठाण, नागेश अंकुश यांनीही भावना व्यक्त केल्या. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ओळ : प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली वाहताना प्रसाद मिरासदार, प्रदीप निफाडकर, डॉ. स्वाती महाळंक, योगेश सोमण, डॉ. माधवी वैद्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी