September 25, 2026

समाजसेवेचा यज्ञ मांडलेल्या संजय नहार यांच्या कार्याला सलाममाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गारसंजय नहार यांचा एकसष्टीनिमित्त अभीष्टचिंतन सोहळा

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे : देशाच्या ज्या भागात समस्या आहेत, दुःख आहेत, तिथे सर्वांआधी पोहोचून, स्वतःच्या नावाने नव्हे तर महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, असा संदेश ज्यांनी दिला आणि समाजसेवेचा यज्ञ सातत्याने सुरू ठेवला, त्या संजय नहार यांच्या कार्याला मी सलाम करतो, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे काढले.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांची एकसष्ठी, त्यानिमित्त ‘सरहदचा सांगाती’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि सरहद संस्थेची त्रिदशकपूर्ती, असा त्रिविध योग साधून आयोजिण्यात आलेल्या विशेष समारंभात शिंदे अध्यक्षपदावरून बोलत होते. या वेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगरविकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ललित गांधी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पुणे पुस्तक न्यासाचे मुख्य समन्वयक राजेश पांडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, संपादक राजीव खांडेकर, मणिपूरचे खासदार प्रमोद बोडो, लडाखचे खासदार मोहंमद हनीफा जान, जम्मूकाश्मीरचे ज्येष्ठ उद्योजक मुश्ताक छाया, श्रीनगरचे संपादक फैयाज कल्लू, स्वतः संजय नहार, सुषमा नहार यांच्यासह गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, संतसिंह मोखा, युवराज शहा, इंज्र छाजेड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते संजय नहार यांचेएकसष्टीनिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. गौरवग्रंथाच्या प्रकाशनासह सरहद संस्थेची त्रिदशकपूर्तीही साजरी करण्यात आली. सरहद संस्था आणि संजय नहार यांच्या कार्यावरील दृकश्राव्यफीत दाखविण्यात आली. यावेळी उद्योजक अविनाश चोरडिया यांनी सरहद संस्थेच्या कार्याला ६१ लाखांची देणगी जाहीर केली.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये जायला कुणी धजावत नसताना संजय नहार धगधगत्या पंजाबात गेले. वाड्यावस्त्यांवर फिरले. तिथल्या दुःखी, अनाथ जिवांना भेटले. त्यांना दिलासा दिला. रस्त्यावर उतरून थेट साह्य केले. कठीण परिस्थितीत महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला. काश्मीरमध्ये परिस्थिती गंभीर होताच, ते काश्मीरमध्ये पोहोचले. अनाथ मुलांच्या भवितव्याची सर्व जबाबदारी स्वीकारून, त्यांच्यासाठी पुण्यात निवास, शिक्षणाची सोय केली. नहार यांच्या विचार आणि कृतीत अंतर नाही. प्रतिकूल परिस्थिती, जीवे मारण्याच्या धमक्या, हल्ले यांना न घाबरता त्यांनी समाजसेवेचा यज्ञ व्रताप्रमाणे सुरू ठेवला आहे. त्यांचे हे कृतीशील जगणे प्रेरणादायी आहे.

ऑनलाईन पद्धतीने संवाद साधताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय एकता, अखंडता अबाधित ठेवण्यासाठी लोकप्रबोधनाचे संजय नहार यांचे कार्य अभिमानास्पद आहे. देशाच्या सीमाभागात जेव्हा संघर्ष उफाळला, तेव्हा राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी संजय नहार यांनी संघटित प्रयत्न केले. पेटत्या पंजाबमध्ये त्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून २१ शांततायात्रा केल्या. सर्व भेदांपलीकडे जात, माणुसकीचे नाते जपले आहे आणि अनेक भागांत गुणात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. सध्या भोवताली विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यतेचे संकट दिसत असताना, सामाजिक संवेदनशीलता जपत समाजकारणाचा आदर्श संजय नहार यांनी निर्माण केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी चळवळीच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला. देशात जिथे समस्या तिथे संजय नहार, असे दृष्य असते. एकात्मतेची भावना वर्धिष्णु कशी होईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील, कृतीशील असे व्यक्तिमत्व म्हणजे संजय आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील चुकीचे, अयोग्य विचार काढून योग्य, देशप्रेमाचे विचार रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे.

विद्यार्थी चळवळीपासून स्नेहबंध असणारा आणि अविरत संघर्ष करत देशासाठी सेवाकार्याचे सातत्य जपणारा संजय, असे वर्णन माधुरी मिसाळ यांनी केले तर तनमनाने देशाला समर्पित असा मित्र, असा उल्लेख राजेश पांडे यांनी केला. संजय नहार हे महाराष्ट्रधर्माचे आजच्या काळातील पाईक आहेत, असे डॉ. सदानंद मोरे म्हणाले.
लडाख आणि काश्मीरमधील पर्यटनाच्या अनेक वेगळ्या शक्यतांचा वेध घेऊन विकासाचा, रोजगाराचा, शिक्षणाचा मार्ग संजय नहारांनी कार्यातून दाखवला आहे, असे मनोगत लडाखच्या व काश्मीरच्या खासदारांनी मांडले. रणजीतसिंह मोहिते पाटील, राजीव खांडेकर, गिरीश गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश पगारिया यांनी प्रास्ताविक केले. नीरजा आपटे आणि वैभव वाघ यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.
चौकट
व्यकीपेक्षा कार्य उरावे….
संजय नहार यांची भावना
गौरवाला उत्तर देताना संजय नहार यांनी सर्व कार्याचे श्रेय सहकारी, मित्र आणि कुटुंबीयांचे एकत्रित आहे, असे सांगितले. सर्वांनी वेळोवेळी सहकार्य केले, मी नाममात्र होतो, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. क्रांतिकारक भगतसिंग हे माझे नायक आहेत. आपण शरीराने टिकून राहण्यापेक्षा विचाराने अधिक काळ टिकतो, असे भगतसिंग म्हणत असत. माझा आदर्श तोच आहे. व्यक्तीपेक्षा कार्य मोठे आणि दीर्घजीवी होत राहावे, असे वाटते. या प्रवासात अनेकानेक माणसे जोडली गेली. आता जबाबदारी पेलणारी नवी पिढी तयार झाली आहे, याचे समाधान वाटते. मी एकट्याने काही केले नाही. सर्वांची साथ होती म्हणूनच कार्य उभे राहिले. अशी साथ ज्या समाजात मिळते, तिथे कधीच अंधार होणार नाही. नव्या ज्योती उजळत राहतील. त्यामुळे हा गौरव माझा वैयक्तिक नसून, तो प्रत्येकाचा आहे, अशी भावना नहार यांनी मांडली.
फोटो ओळ : संजय नहार यांचा गौरव करताना माधुरी मिसाळ, सुशीलकुमार शिंदे, चंद्रकांत पाटील आदी.

प्रति,
मा. संपादक
सरदह, पुणेचे संस्थापक संजय नहार यांचा एकसष्ठी अभीष्टचिंतन सोहळा, गौरव ग्रंथ प्रकाशन आणि सरहदचा त्रिदशकपूर्ती सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्‌धी द्यावी ही विनंती.
शैलेश वाडेकर, कार्याध्यक्ष, गौरव समिती
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी