September 25, 2026

शिक्षणाद्वारे चारित्र्य, मानवी मूल्ये, सर्जनशील विचारांची निर्मिती व्हावी : कर्नल प्रा. शिशिर कुमारदि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षाला प्रारंभ : बोधचिन्हाचे अनावरण

0
IMG-20260826-WA0036
Spread the love

पुणे : गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे असून त्याचा उद्देश चारित्र्य, मानवी मूल्ये आणि सर्जनशील विचारांची निर्मिती करणे हा असणे आवश्यक आहे. ज्या शिक्षणातून चारित्र्याची निर्मिती होत नाही त्या शिक्षणाला काहीही अर्थ नाही. शिक्षण हा अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन निवृत्त कर्नल प्रा. शिशिर कुमार यांनी केले.

शैक्षणिक क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली वाटचालीचा ठसा उमटविणाऱ्या दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला २९ ऑगस्ट २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. ‘शतकाचा वारसा… भविष्याचा ध्यास!’ या संकल्पनेतून संस्थेच्या शताब्दी वर्षाला आज (दि. २६) प्रारंभ झाला. या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात प्रा. शिशिर कुमार बोलत होते. सोमवार पेठ येथील संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्याध्यक्ष संजीव महाजन, मानद सचिव प्रफुल्ल निकम, कोशाध्यक्ष निलेश येवलेकर, उपाध्यक्ष भारत वेदपाठक मंचावर होते.
या सोहळ्यात संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण, संस्थापक दिन विशेष कार्यक्रम तसेच यंदाच्या बोर्ड परीक्षेत रात्र प्रशालेतील महाराष्ट्रात प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या वसुप्रद कुलकर्णी, अंकुश रेवाळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा व एमपीएससी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या निधी अत्रे यांचा गौरव करण्यात आला.
प्रा. शिशिर कुमार पुढे म्हणाले, शिक्षित असलेली व्यक्ती प्रबुद्ध आणि आनंदी असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा साठा आणि कौशल्ये विकसित करण्याची ताकद देणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमानी विद्यार्थी घडण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही शिक्षकाने विद्यार्थ्याचे खच्चीकरण न करता तो कशा पद्धतीने आणि आवडीने शिकेल याचा विचार पेरत त्याच्या मनात बौद्धिक उत्सुकता निर्माण केली पाहिजे. यातूचन प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर शिकत राहिल आणि ज्ञान आकलन करून घेण्यासाठी प्रश्न विचारत राहिल. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक दूरदृष्टी असलेले होते. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून समाजाचे भवितव्य बदलून टाकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. हीच परंपरा पद्मविभूषण प्रभा अत्रे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आणि हेच कार्य संस्थेचे पदाधिकारी पुढे नेत आहेत.
शतक महोत्सवी वर्षाचे सिंहावलोकन करताना संजीव ब्रह्मे म्हणाले, राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. त्याच प्रमाणे रात्र प्रशाला सुरू करणे हा निर्णयही प्रगल्भपणे घेतला गेला आहे. प्रभाताई अत्रे यांची स्पंदने आजही या वास्तूत जाणवतात. या शाळेचा आलेख सातत्याने उंचावत जाताना दिसतो आहे.
संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संजीव महाजन म्हणाले, शतक महोत्सवी वर्षाला सुरुवात होणे ही फक्त कालगणना नव्हे तर इतिहासात घडलेल्या महान कार्याचा गौरव आहे. यात संस्थेचे संस्थापक, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्यत्वेकरून विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने संस्था अखंडितपणे कार्यरत आहे.
प्रफुल्ल निकम यांनी संस्थेची भविष्यकाळातील वाटचाल कशी असेल याविषयी अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.
वर्षा महाजन यांनी सूत्रसंचालन केले तर भारत वेदपाठक यांनी आभार मानले. संजीव ब्रह्मे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
फोटो ओळ : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षाच्या बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी (डावीकडून) विवेक शिरोडे, भारत वेदपाठक, संजीव महाजन, कर्नल प्रा. शिशिर कुमार, संजीव ब्रह्मे, प्रफुल्ल निकम, निलेश येवलेकर.
प्रति,
मा. संपादक
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला २९ ऑगस्ट २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण होत असून ‘शतकाचा वारसा… भविष्याचा ध्यास!’ या संकल्पनेतून संस्थेच्या शताब्दी वर्षाला बुधवारी (दि. २६) प्रारंभ झाला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
प्रफुल्ल निकम, मानद सचिव
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी